मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आधार छत्रीचा… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आधार छत्रीचा… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

टिपावे थेंब पाण्याचे घुमे गंधार छत्रीचा

कुठे ऐकायला येई कसा ओंकार छत्रीचा

असावे ऊन टळटळते ढगांची पालखी नाही

जपाया देह उघड्यावर मिळे आधार छत्रीचा

प्रियेला भेटण्यासाठी नसावा एक आडोसा

जरासे ओठ लपवाया खरा संस्कार छत्रीचा

मुलांची पाहता वदने कळाले माय बापाला

सरावा पावसाळा अन् उगा हा भार छत्रीचा

कुणाला लाभते छत्री छताचे मोलही कळते

कुठे वृद्धाश्रमी छ्त्री सुना व्यवहार छत्रीचा

अम्हाला काळजी नाही सुखी वृद्धाश्रमी दोघे

कधी झुकणार ना आम्ही असे निर्धार छत्रीचा

छतावाचून घरट्याची करावी कल्पना नुसती

कडी कुलुपाविना दारे असे उपकार छत्रीचा

गझलनंदा

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈