मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #213 ☆ चप्पल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 213 ?

☆ चप्पल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

ही चप्पल पायामधली, बघ काय सांगते आहे

तू रुबाबात फिरताना, ती धूळ चाटते आहे

ती झिजते तुझ्याचसाठी, तू डोंगर चढतो तेव्हा

तू कोचावर बसता ती, दारात थांबते आहे

ती असता नवीन कोरी, तो पसंत करतो तिजला

मापातच असल्यानंतर, ती त्यास भावते आहे

पायात घालण्यापुरती, ही किंमत आहे माझी

का उसवत गेल्यावरती, मी धाप टाकते आहे

तो नवी घेऊन आला, तेव्हाच जाणले मीही

तो टाळत जातो मजला, मी त्यास टाळते आहे


या माझ्या अस्तित्वाला, किंमत कुठलीही नाही

पाहून वेग मी त्याचा, वेगात चालते आहे

मी कोल्हापुरची राणी, बहुमान वाटला होता

पायाची दासी झाले, तो धर्म पाळते आहे

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈