मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #177 ☆ संत रामदास… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 177 ☆ संत रामदास…☆ श्री सुजित कदम ☆

नारायण ठोसर हे

समर्थांचे मुळ नाव

राम आणि हनुमान

अंतरीचा घेती ठाव…! १

 

बालपणी ध्यानमग्न

अष्टमित्र सहवास

ज्ञान संपादन कार्य

विश्व कल्याणाचा ध्यास..! २

 

गाव टाकळी नासिक

जपतप अंगीकार

तपश्चर्या रामनाम

दासभक्ती आविष्कार…! ३

 

केली दीर्घ तपश्चर्या

पंचवटी तीर्थ क्षेत्री

रामदास नावं नवे

प्रबोधक तीर्थ यात्री….! ४

 

एकाग्रता वाढवीत

केली मंत्र उपासना

तेरा अक्षरांचा मंत्र

राम नामाची साधना…! ५

 

रघुवीर जयघोष

रामदासी दरबार

दासबोध आत्माराम

मनोबोध ग्रंथकार…! ६

 

दैनंदिन तपश्चर्या

नाम जप तेरा कोटी

रामदासी कार्य वसा

ध्यान धारणा ती मोठी…! ७

 

श्लोक मनाचे लिहिले

आंतरीक प्रेरणेने

दिले सौख्य समाधान

गणेशाच्या आरतीने…! ८

 

श्लोक अभंग भुपाळ्या

केला संगीत अभ्यास

रागदारी ताल लय

सुरमयी शब्द श्वास….! ९

 

रामदासी रामायण

ओव्या समासांची गाथा

ग्रंथ कर्तृत्व अफाट

रामनामी लीन माथा…! १०

 

प्रासंगिक निराशा नी

उद्वेगाचे प्रतिबिंब

वेदशास्त्र वेदांताचे

रामदास रविटिंब….! ११

 

दिली करुणाष्टकाने

आर्त भक्ती आराधना

सामाजिक सलोख्याची

रामभक्ती संकल्पना…! १२

 

शिवराय समर्थांची

वैचारिक देवघेव

साधुसंत उपदेश

आशीर्वादी दिव्य ठेव…! १३

 

पुन्हा बांधली मंदिरे

यवनांनी फोडलेली

देवी देवता स्थापना

सांप्रदायी जोडलेली…! १४

 

वैराग्याचा उपासक

दासबोध नाही भक्ती

दिली अखिल विश्वाला

व्यवहार्य ग्रंथ शक्ती….! १५

 

आत्य साक्षात्कारी‌ संत

केले भारत भ्रमण

रामदास पादुकांचे

गावोगावी संक्रमण…! १६

 

दासबोध ग्रंथामध्ये

गुरू शिष्यांचा संवाद

हिमालयी एकांतात

राम रूप घाली साद…! १७

 

राम मंदिर स्थापना

गावोगावी भारतात

भक्ती शक्ती संघटन

मठ स्थापना जनात….! १८

 

दिले चैतन्य विश्वाला

हनुमान मंदिराने

सिद्ध अकरा मारुती

युवा शक्ती सामर्थ्याने…! १९

 

नाना ग्रंथ संकीर्तन

केले आरत्या लेखन

देवी देवतांचे स्तोत्र

पुजार्चना संकलन…! २०

 

स्फुट अभंग लेखन

श्लोक मनाचे प्रसिद्ध

वृत्त भुंजंग प्रयात

प्रबोधन कटिबद्ध….! २१

 

केले विपुल लेखन

ओवी छंद अभंगांत

कीर्तनाचा अधिकार

दिला महिला  वर्गात….! २२

 

धर्म संस्थापन कार्य

कृष्णातीरी चाफळात

पद्मासनी ब्रम्हालीन

समाधिस्थ रामदास…! २३

 

गड सज्जन गातसे

रामदासी जयघोष

जय जय रघुवीर

दुर पळे राग रोष…! २४

 

माघ कृष्ण नवमीला

दास नवमी  उत्सव

रामदास पुण्यतिथी

भक्ती शक्ती महोत्सव…! २५

 © श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈