मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आस फुलते मनात

देता चाहूल पाऊस

वादळाच्या सोबतीने

चळवळतो पाऊस

 

रान तापते उन्हात

मग मागते पाऊस

गंध मातीचा हुंगाया

तळमळतो पाऊस

 

शेती माती पिकवाया

येतो धावत पाऊस

हळू  हळू  धरेवरी

घरंगळतो पाऊस

 

आभाळाच्या गाभाऱ्यात

जातो धावत पाऊस

रान गारठा पाहून

अडखळतो पाऊस

 

बरसता धुवाधार

फार थकतो पाऊस

रान ओलं गंधाळता

डळमळतो पाऊस

 

जोर ओसरतो तेव्हा

शांत वाटतो पाऊस

मंदवा-याच्या तालात

कळवळतो पाऊस

 

ओढ्या नाल्यांचा सोबती

मग बनतो पाऊस

धार होऊन पाण्याची

खळखळतो पाऊस

तनामनात सारखा

रोज मुरतो पाऊस

चैतन्याच्या रुपातून

सळसळतो पाऊस

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈