मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अद्वैताचा साक्षीदार… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ अद्वैताचा साक्षीदार… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

पाऊस असा कोसळतो

धक धक धडकी भरतो

वणवाच उरी चेततो

बेभानपणे अवतरतो

 

गोष्टीत ॠतुंच्या रमतो

गालांवर टप टप पडतो

केसांत बटांवर झुलतो

ओठांवर चिंब नहातो

 

कंकणात किण किण करितो

मुरलीसम अधरी धरितो

तिन्हीसांजे वचनी बुडतो

झोपडीत अधीर होतो

 

पाऊस असा कोसळतो

राधे सह रंग बहरतो

सावळ्यात रंग विरघळतो

अद्वैत उराशी घेतो

 

पाऊस नभातून येतो

थेंब थेंब झिरपत रहातो

 ज्ञानदेवे ओवी गातो

अद्वैत मुळाशी धरितो

 

पाऊस सरींचा येतो

मुक्तेचे गाणे गातो

लखलखता प्रकाश देतो

गात्रात विजेसम भरतो.

 

पाऊस कधी पण येतो

टाळात तुकोबा रमतो

बेभान होत नाचतो

विठ्ठलात दंग रहातो

 

पाऊस साक्षही होतो

अध्यात्म मनाचे जपतो

पण प्रियाराधनी रमतो

द्वैतीद्वैत मिसळतो

 

पाऊस असा रिमझिमतो

मौनात मौन रिझवितो

अद्वैत पाहुनि खुलतो

निश्चिंत करुनिया जातो.

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈