मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #198 ☆ ‘नवीन आज्ञा…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 198 ?

☆ नवीन आज्ञा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

येणार कोण पक्षी धान्यास कापल्यावर

शेतात मौज तोवर येतील जोंधळ्यावर

कात्रीत सापडोनी झाली दशा अशीही

शिवता पुन्हा न आले काळीज फाटल्यावर

एकाच ईश्वराची आहोत लेकरे तर

का ठेवले अजूनी जातीस दाखल्यावर

दारिद्र्य पाचवीला त्यातच नवीन आज्ञा

सांगा कसे जगावे वाळीत टाकल्यावर

काहे तिखट म्हणूनच ठेचून काढले मी

मिरची कुठे बदलली गुण तोच ठेचल्यावर

नाही पराभवाची चिंता मनास आता

साऱ्या तमोगुणांची मी साथ सोडल्यावर

जल गोठले तरीही फुटतो तयास पाझर

पाझर मला न फुटला का रक्त गोठल्यावर

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈