मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुणा थांग लागे कवीच्या मनाचा…? ☆ सुश्री अर्चना देवधर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ कुणा थांग लागे कवीच्या मनाचा…? ☆ सुश्री अर्चना देवधर ☆

(वृत्त-भुजंगप्रयात, लगागा लगागा लगागा लगागा, अक्षरे-१२,मात्रा-२०)

कुणा थांग लागे कवीच्या मनाचा?

तिथे खेळ रंगे नव्या कल्पनांचा

जशी माउली भोगते जन्मवेणा

कवी सोसतो निर्मितीच्या कळांना

 

जसे लाभती गर्भसंस्कार बाळा

 तसा बुद्धिला भावनांचा उमाळा

कधी शब्दगंगा खळाळून वाहे

परीक्षा कधी ती कवीचीच पाहे

 

निसर्गातली मोहवी दिव्य शोभा

कधी चन्द्र सूर्यातली तेज आभा

कधी रंगतो मंदिरी वा शिवारी

कवी मुक्त व्योमात घेई भरारी

 

कधी दुःखितांच्या व्यथांनी दुखावे

सुखाच्या कधी जाणिवांनी सुखावे

कधी शब्दशस्त्रे खुबीने उगारी

कधी वेदनेच्या झळांना झुगारी

 

कधी वृत्तबंधात बांधून घेतो

कवी मुक्तछंदातही मग्न होतो

कधी श्रावणी धुंद धारात न्हातो

तसा चांदण्याच्या प्रवाहात गातो

 

कवीला मिळे लेखणीचीच दीक्षा

कधी भोगतो हा स्तुती वा उपेक्षा

कवी शारदेचा खरा दास आहे

स्वयंनिर्मितीचा तया ध्यास राहे

 

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈