मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अग्निदेवता… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अग्निदेवता… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

झळझळणाऱ्या दीपशिखा

तेजोमय या किरण शलाका

दिव्यत्वाची लखलख रेखा

भव्यतेची दिव्यतम शाखा

 

ज्योतिर्मय तव दिव्य प्रकाशी

सुवर्ण झळके बावनकशी

मायेची तव ऊब देऊनी

जीवांसी जगवून  प्रेम देशी

 

समदर्शी रे तू स्वयंप्रकाशी

जीवन फुलवूनी उजळत जाशी

तव साक्षीने मने ही गुंफिशी

जन्मभरीचे बंध बांधून देशी

 

जठराग्नी तू पाचनकारी

चित्ताग्नी रे बुध्दिकारी

सर्वाग्नी तू योगकारी

वडवाग्नी तू सागरांतरी

 

रुपे किती तव  जीवनकारी

सदा  मग्न   तू परोपकारी

कधी होसी परी प्रलयंकारी

रुप तुझे ते अती भयंकरी

 

जसे उग्रतम रुप घेशी

ओले,सुके सर्व जाळीशी

भेदभाव जरा न करिशी

सर्वच  भस्मीभूत करिशी

 

मानबिंदू तू जीवनदाता

समदर्शी रे  प्राणदाता

अग्निदेवता पुराणोक्ता

तवपदी ठेवते त्रिवार माथा

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈