मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आधुनिक ओव्या–☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आधुनिक ओव्या– ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

अरे  न्याहारी ,न्याहारी —

ठेवा पॅन गॅसवरी–

भाजी,लोणी ,चटणी–

पसरा ग—डोश्यावरी  ||१||

 

सुंदर माझा मिक्सर ग–

शोभतो– ओट्यावर,

पीठ रुबते भराभर–

वडा ईडली वरचे वर  ||२||

 

लाडका ग माझा फ्रीज,–

जसा राधेचा ग कान्हा,

ग्रेव्ही करुन एकदा,–

करते भाजी पुन्हा पुन्हा ||३||

 

ओव्हनची ग माझ्या–

कथा आहे न्यारी न्यारी,

त्याच्या कुशीत फुलते —

बिस्किट केकवरची चेरी ||४||

 

चैत्री सजली चैत्रगौरी–

श्रावणात मंगळागौरी,

आता करु पुरणपोळी —

 गणराया संगे आली गौरी ||५||

 

स्क्रीनपुढे सदा असतो–

लाडका ग बाळ माझा,

खायला न दुजे मागे–

देता मॅगी ,बर्गर, पिझा ||६||

 

लेक माझी ग लाडकी —

शिकाया दुरदेशी,

डोळा  का ग येते पाणी–

विडीयो कॉल रात्रंदिशी ||७||

 

माझ्या ग अंगणी—

ऊभी स्कुटर देखणी,

फिरते मी तिच्या संगे–

सखी माझी ग साजणी ||८||

 

हॉल सजला सजला–

टी,व्ही. मोठा भिंतीवर,

मालिकेतली भांडणे —

मौने पाहे घरदार ||९||

 

मन कंटाळे कंटाळे–

विसरले राम नाम,

हाती असता मोबाईल–

कसे करु कामधाम ?||१०||

 

मागे गेले नऊवार–

नको झाले सहावार,

नानाविध कुडत्यांसंगे–

पुरते एक सलवार ||११||

 

फ्लॅटमघला ग फ्लॅट–

हव्या बेडरुम तीन,

फुलवेन टेरेसवर —

जाईजुई ग मी छान ||१२||

 

© सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈