मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावळ्या… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ सावळ्या… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

तुझिया मागुनि, येईन त्यागुनि

निरर्थ या तनुला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

प्रथम भेट तव बालपणीची

खोडी काढिसी गोपगोपींची

चोरी करिसी नवनीताची

विश्व दाविसी तुझ्या मुखातुनि

माय यशोदेला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

चाहुल येता तारुण्याची

हुरहुर लावी धुन मुरलीची

अमूर्त मूर्ती तव रूपाची

वाटे येशील घन मेघातुनि

भिजवशील मजला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

ऊन सावली संसाराची

आस नुरे मग तुझ्या भेटीची

कसरत असुनि तारेवरची

लिप्त जिवाला त्यातच करुनि

विसरुनि जाई तुला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

ओढ लागता पैलतीराची

वेणुरवाची, तव भासाची

अता विनवणी ही शेवटची

वक्षी तुझ्या घे मला कवळुनि

जवळुनि पाहीन तुला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

क्षण अखेरचे वेळ भेटीची

क्षितिजा नक्षी मोरपिसाची

कारुण्य पाझरे ओळ ढगांची

अनंग तुझिया अंगांगातुनि

वेढशील का मला

सावळ्या नेशील का रे मला॥

 

तुझिया मागुनि, येईन त्यागुनि

निरर्थ या तनुला

सावळ्या नेशील का रे मला॥

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈