मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन सत्याला भेटव बाबा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मन सत्याला भेटव बाबा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

(पादाकुलक)

निघून जाते वैभव बाबा

व्यर्थ धावणे थांबव बाबा

 

दिवस मागचे पुन्हा आठवत

कपट मनातच साठव बाबा

 

आदर्शाने जगण्यासाठी

स्वप्न तुझे तू रंगव बाबा

 

काळ कुणाचे नाही ऐकत

नकली बडबड थांबव बाबा

 

पंख पसरले नभात ज्यानी

बळ त्त्याना तू पाठव बाबा

 

तुझ्या सुखाच्या डबक्या मधले

पाणी थोडे आटव बाबा

 

परोपकाराच्या वाटेवर

मन थोडेसे गुंतव बाबा

 

फुकटपासरी अभिमानाचे

तुझेच नाटक संपव बाबा

 

उसने आहे ज्ञान मिळाले

तेच जगाला ऐकव बाबा

 

रडक्या कुजक्या या देहाला

वस्त्र रेशमी नेसव बाबा

 

अखेरचा मग सलाम करण्या

मन सत्याला भेटव बाबा

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈