मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आठवत नाही… ☆ श्री विठ्ठल बाबुराव घाडी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ आठवत नाही… ☆ श्री विठ्ठल बाबुराव घाडी ☆

आठवत नाही मला मी टाकलेल पहिल पाऊलं…

रोज दिसतो तोच आनंद अजूनही आईच्या चेहऱ्यावर..

 

आठवत नाही मला मी उच्चारलेला पहिला शब्द….

अर्थ गवसलेला आनंद दिसतो बाबांच्या चेहऱ्यावर..

 

आठवत नाही मला पाठीवरचा पहिला धपाटा….

रोज पहातो पाठीमागुन ही विश्वास बहिणींच्या चेहऱ्यावर..

 

आठवत नाही मला मी खेळात हरलेला दिवस….

माझ्या विजयाचा आनंद रोज पहातो मित्रांच्या चेहऱ्यावर..

 

आठवत नाही मला तुमच्या समोर मी कधी आलो….

रोज पहातो आत्मविश्वास माझा अनोळखी समाजाच्या चेहऱ्यावर….

 

आठवत नाही मला माझीच ओळख मिळालेला क्षण….

आणि आठवू सुद्धा नये त्या मी पणाची ओळख..

 

आठवत नाही मला कधी मिळाले शब्द तुमचे….

आपल्याच शब्दांचा ठसा उमटतो प्रत्येकाच्या मना मनावर..

 

आठवत नाही मला कधी शोधले आपल्या शब्दात अस्तित्व माझे….

त्याच अस्तित्वासाठी मन जडले या आपल्या विश्वप्रार्थनेवर..

 

सारे आठवण्यासाठीच तर शुभ प्रभात होते..

शुभेच्छा देऊन घेऊन लक्ष ठेवू कार्यावर…

 

© श्री विठ्ठल बाबुराव घाडी

चारकोप

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈