मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बेपत्ता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ बेपत्ता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(षडाक्षरी)
कढ अंतरीचे
आटलेले सारे
निचऱ्यात आता
साठलेले सारे
शमलेले सारे
व्यथांचे क्रंदन
ह्रदी शिणलेले
मौनाचे स्पंदन
दाह लौकिकाचे
शांत शांत आता
उरे काळजात
स्मशानशांतता
कधीमधी जागी
आठवांची भूते
अर्थशून्य भास
तेवढ्यापूरते….
काल होतो तसा
आज झालो असा
दावितो वाकुल्या
चक्क हा आरसा
होतो जेव्हा माझा
माझ्याशीच द्रोह
कवेत घ्यावया
साद घाली डोह
जमा इतिहासी
आयुष्याचे टप्पे
सुने हळूहळू
काळजाचे कप्पे
स्मृतिभ्रष्ट कोणी
निनावी गर्दीत
आपुलाच पत्ता
हिंडतो शोधित !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈