मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #135 ☆ संत सोपान देव… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 135 ☆ संत सोपान देव … ☆ श्री सुजित कदम ☆

 

ज्ञाना निवृत्ती सोपान

आणि मुक्ताई धाकली

चार वेद अध्यात्माचे

जणू एकात्म आवली…! १

 

सुसंस्कृत जीवनाचा

ठरे सोपान वारसा

अध्यात्मिक उन्नतीचा

संत सोपान आरसा…! २

 

ग्रंथ सोपान देवीत

केल्या अभंग रचना

उरी अपार करूणा

विश्व शांती  संकल्पना…! ३

 

तीर्थाटन माधुकरी

भटकंती समाजात

केली मलिनता दूर

भक्तीभाव अभंगात…! ४

 

ज्ञानगंगा सोपानाची

ठेवा अक्षय अभंग

काळजाला काळजाने

भेटवीला पांडुरंग…! ५

 

पांडुरंग चरणांची

हवी अंतराला ओढ

एका एका अभंगाला

लाभे हरिनाम जोड…! ६

 

भक्तीमय भावनांनी

दिली अलौकिक ठेव

संत सोपान देवाची

सांप्रदायी देवघेव…! ७

 

स्वर्गलोक शब्दांकन

पंढरीचा थाट माट

अभंगात वर्णियेला

प्रपंचाचा हरी घाट…! ८

 

दिला जीवन विचार

अंतर्मुख झाले जन

सोपानाच्या अभंगात

लीन झाले तन मन…! ९

 

समाधिस्थ ज्ञानदेव

गेला जीवन आधार

हरी रूप झाला देह

पंचतत्व उपचार…! १०

 

मार्गशीर्ष वद्य पक्षी

संपविला अवतार

संत सोपान समाधी

सासवडी अंगीकार…! ११

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈