मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #163 ☆ बीज प्रीतीचं… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 163 ?

☆ बीज प्रीतीचं… ☆
वर्षाराणीच्या ध्यासानं बीज प्रीतीचं पेरलं

तिच्या भेटीत बियाणं होतं छानसं रुजलं

 

कोंब आले तरारुन होती माती खूष झाली

हिरव्याच्या सोबतीनं गालामध्ये ती हासली

दडी मारता पाऊस कोंब पुन्हा ते झोपलं

 

प्रीत चार दिवसांची होती मनात ठसली

वर्षाराणी पुन्हा कशी माझ्यावरती रुसली

भेगाळल्या जमिनीचं पुन्हा काळीज फाटलं

 

दुबार ह्या पेरणीला मन धजावत नाही

किती नांगरू भुईला नाही उमगत काही

पावसाशी नातं होतं कसं त्यानं ते तोडलं

 

नाद शेतीचा सोडला सोडलं मी गणगोत

भक्ती रसात भिजलो ईश्वराच्या नामी रत

सोडुनीया सर्व काही वस्त्र भगवं नेसलं

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈