मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नियमांस सक्त येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ नियमांस सक्त येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : आनंदकंद – गागाल गालगागा गागाल गालगागा)

नियमांस सक्त येथे अपवाद फार होते

दाते भिकार काही याचक उदार होते !

 

कळपात होयबांच्या शिरलो कधीच नाही

मानी बुलंद माझे काही नकार होते !

 

तपसाधना युगांची नाही फळास आली

होण्यास संधिसाधू…साधू तयार होते !

 

संग्राम घोर होता…संताविरुद्ध संत

श्वासात रोखलेले काही थरार होते !

 

सरला वसंत आता अधिराज्य पावसाचे

जलशात बेडके पण कोकिळ फरार होते !

 

झाले मरण सुगंधी अंतिम तुझाच घाव

किरकोळ बेहिशेबी बाकी प्रहार होते !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈