मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #133 ☆ फराळ..! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 133 ☆ फराळ..! ☆ श्री सुजित कदम ☆

(दिवाळी निमित्त एक खास कविता….!)

आई म्हंटली दिवाळीला

फराळ करू छान

फराळात चकलीला

देऊ पहिला मान..!

 

गोल गोल फिरताना

तिला येते चक्कर

पहिलं कोण खाणार

म्हणून घरात होते टक्कर..!

 

करंजीला मिळतो

फराळात दुसरा मान

चंद्रासारखी दिसते म्हणून

वाढे तिची शान..!

 

एकामागून एक करत

करंजी होते फस्त

फराळाच्या डब्यावर

आईची वाढे गस्त..!

 

साध्या भोळ्या शंकरपाळीला

मिळे तिसरा मान

मिळून सा-या एकत्र

गप्पा मारती छान…!

 

छोट्या छोट्या शंकरपाळ्या

लागतात मस्त गोड

दिसत असल्या छोट्या तरी

सर्वांची मोडतात खोड..!

 

बेसनाच्या लाडूला

मिळे चौथा मान

राग येतो त्याला

फुगवून बसतो गाल..!

 

खाता खाता लाडूचा

राग जातो पळून

बेसनाच्या लाडू साठी

मामा येतो दूरून..!

 

चटपटीत चिवड्याला

मिळे पाचवा मान

जरा तिखट कर

दादा काढे फरमान..!

 

खोडकर चिवडा कसा

मुद्दाम तिखटात लोळतो

खाता खाता दादाचे

नाक लाल करतो…!

 

रव्याच्या लाडूला

मिळे सहावा मान

पांढरा शुभ्र शर्ट त्याचा

शोभून दिसतो छान…!

 

आईचा लाडका म्हणून

हळूच गालात हसतो

दादा आणि मी मिळून

त्यालाच फस्त करतो…!

 

लसणाच्या शेवेला

मिळतो सातवा मान

जास्त नको खाऊ म्हणून

आई पिळते माझा कान..!

 

शेवेचा गुंता असा

सुटता सुटत नाही

एकमेकां शिवाय ह्यांचं

जरा सुद्धा पटत नाही…!

 

दिवाळीच्या फराळाला

सारेच एकत्र येऊ

थोडा थोडा फराळ आपण

मिळून सारे खाऊ..!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈