मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #127 – जगणं…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 127 – जगणं…! 🍃 श्री सुजित कदम ☆

माझ्या मायेला डोक्यावरून

पाण्याचा हंडा घेऊन येताना

पाहीलं ना

की वाटतं पाण्याशिवाय

जगता आलं असतं तर

किती बरं झालं असत….

माझ्या मायेच्या पायाना

झालेल्या जखमांची संख्या

जरा कमी झाली असती…

आणि

भेगाळलेल्या भुईसारखी

कोरड्या पडलेल्या घशाची

तहान आम्हाला

पाण्याच्या एका घोटावर

भागवावी लागली नसती

गोठ्यातली जनावर

डोळ्यांसमोर तडफडून मरून

पडली नसती

अन् कर्जामुळ माझ्या बापाला

आत्महत्या ही करवी लागली नसती…

लहान असतानाच माझ्या मायेन

मला बोट धरून

डचमळत का होईना

पाण्याचा तांब्या हातात धरून

चालायला शिकवलय

तेव्हा मी

ओळखू शकलो नाही

की माझी माय मला

चालायला आणि जगायला

दोन्ही शिकवतेय ते

माय नेहमी म्हणायची

तूला चालता आणि जगता दोन्ही यायला हवंं

कारण

चाललास तर पाणी आहे

अन् पाणी आहे तर जगणं आहे…

आज इतक्या वर्षी नंतर ही

माय डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन चालते आहे

आणि तिच्या बरोबरीने मी ही….!!!!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈