मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्लेषवृक्ष… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ क्लेषवृक्ष… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

शोधतो आजन्म, दिसेच ना मूळ

शोधूनही कूळ.. सापडेना

 

तोडाव्यात फांद्या, तितके अंकूर

फोफावे भेसूर..क्लेषवृक्ष

 

भक्कम हे खोड, फांद्यांचा विस्तार

छाया सर्पगार…साहवेना

 

पाखरांचा टाहो, पानांपानातून

फांदीसही जून…फुटे कोंभ

 

रात्रंदिन चाले, आर्त सळसळ

भोगतो मी छळ..अंतर्यामी

 

जन्मांचीया खोल, मातीमध्ये मूळ

जणू की अटळ… नियती ही

 

आता मज नाही, कुठलीच खंत

मन हे दिगंत…होऊ पाहे

 

सोसण्याचे तप, होईल सफळ

क्लेषवृक्षा फळ… आनंदाचे

 

अन्य जन्माठायी, नको याचे मूळ

व्हावया व्याकूळ… क्षीण.. दीन

 

हीच एक माझी, पुरी व्हावी आस

मुळांचा प्रवास…. संपवी बा

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈