मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || श्री गणेश || ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ || श्री गणेश ||  ☆ सौ. विद्या पराडकर ☆

वंदन श्रीयेशा,

वंदन श्रीयेशा,

बुद्धिदायक हे परमेशा,

यशकीर्तिच्या परेशा ||

 

कार्यारंभी आवाहन करतो,

मनोभावे पूजा करतो,

सुरवर सारे तुजला स्तविती,

दैत्यांनाही येई प्रचिती ||

 

रिद्धीसिद्धी चा आहेस कर्ता,

विघ्ननाशका विघ्नहर्ता,

सुखकारक तू दुःखहर्ता,

सगुणरुपी तू आनंद दाता ||

 

पृथ्वी प्रदक्षिणेची चुरस लागली,

कार्तिक, गणेश सज्ज जाहले,

प्रथम निघाले मयुरावरी कार्तिक,

श्रीगणेशाने मातेलाच प्रदक्षिणा घातली ||

 

प्रदक्षिणेने श्रीगणेशास जयश्रीने सजविले,

बुद्धिमत्तेचे द्योतक श्रीगणेश शोभले,

चौदा विद्यांचा खरे आहेस तू कर्ता,

चौसष्ट कलांचा आहेस दाता ||

 

इतिहासाने सांगितले,

गणेशजी मुषकावरून जात असता कोसळले

त्यामुळे चंद्र हासला शाप दिला गणेशाने

मुख चंद्राचे जो पाही, आळ चोरीचा येई ||

 

शंकराचे आत्मलिंग लंकेश्वर नेता,

अडविले श्रीहरीने गणेश हस्ता,

पश्चिम समुद्री स्थापिले आत्मलिंग हे असे

गोकर्ण महाबळेश्वर म्हणून नावाजले कसे ||

 

ये हासत नाचत गणेशा

दूर करी रे देश समस्या

एकजुटीचा मंत्र देई

देशभक्तीचे गीत गाई ||

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈