मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाफा बोलेना… ☆ कवी बी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ चाफा बोलेना… ☆ कवी बी ☆

चाफा बोलेना, चाफा चालेना

चाफा खंत करी काही केल्या फुलेना ।।

 

गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी

आम्ही गळ्यात गळे मिळवूनी रे॥

 

गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी

नागासवे गळाले देहभान रे॥

 

चल ये रे, ये रे गड्या, नाचू उडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा

झिम पोरी झिम पोरी झिम॥

 

हे विश्वाचे अंगण

आम्हा दिले आहे आंदण

उणे करू आपण दोघेजण ॥

 

जन विषयांचे किडे

यांची धाव बाह्याकडे

आपण करू शुद्ध रसपान ॥

 

चाफा फुली आला फुलून

तेजी दिश्या गेल्या आटुन

कोण मी-चाफा?कोठे दोघे जण?

 – कवी बी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈