मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #153 ☆ माझी किंमत… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 153 ?

☆ माझी किंमत…

वस्तुसारखी माझी किंमत ठरते कळले होते

वेश्या म्हणुनी या देहाला रोज डिवचले होते

 

रूप वसंता तुझे घेउनी आले होते वादळ

वेलीवरच्या फुलास त्याने सरळ फसवले होते

 

अंगावरती घाण टाकली ज्याने होती माझ्या

हात पाहिले त्याचे तेव्हा तेही मळले होते

 

नव्हती तेव्हा रंग पंचमी रंगाला तो आला

अंगावरती नको नको ते रंग उधळले होते

 

कोठडीत मी अन् सूर्याचे स्वप्न पाहिले रात्री

सभोवताली फक्त काजवे माझ्या जमले होते

 

नव्हे शृंखला ते तर पैंजण हाती नाही बेडी

फासावरती केवळ माझे स्वप्नच चढले होते

 

या देहाचा ठेका नाही कुणी घेतला येथे

काल भेटले त्यांना तर मी आज वगळले होते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈