मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #150 ☆ संवाद… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 150 – विजय साहित्य ?

☆ संवाद… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आज पाहिल

टेबलावरचा बहिणीचा फोटो

जरा जास्तच हसत होता.

तेरा वर्षापासून भाऊबीजेला

याच फोटोशी संवाद व्हायचा.

भावा बहिणीचं नातं

जणू दिवस रात्रीच चक्र

एकमेकांना भेटतात

उदयाला किंवा अस्ताला

एरवी प्रवास चालूच असतो.

भाऊ बहिणीची वाट पहात असतो

माहेरच्या मनमंदिरात

भावाचाच मान असतो.

आई नंतर ताई ,बाबांनतर दादा

नात्याच्या शब्दावलीत नाजुकसा धागा.

छायाचित्र बोलके पुन्हा पुन्हा सांगते.

सुखाच्या आठवात परलोकी नांदते.

कसा आहेस दादा..? फूल हळूच टपकते

नात्यातली ऊब तेव्हा नकळत दरवळते.

हीच खरी दिवाळी अंतरात पाझरते ..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈