मराठी साहित्य – कलास्वाद ☆ निसर्गातून कलाकृतीकडे – कलाकृतीकडून निसर्गाकडे ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

? कलास्वाद ?

☆ निसर्गातून कलाकृतीकडे – कलाकृतीकडून निसर्गाकडे ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

निसर्ग हा सर्वात मोठा कलाकार आहे. त्याने निर्माण केलेल्या कोणत्याच दोन गोष्टीत सारखेपणा नसतो. एवढी विविधता आहे निसर्गात. सर्व झाडे  हिरवीच. पण प्रत्येक झाडाचे हिरवेपण वेगळे. प्रत्येक झाडाची उंची वेगळी. आकार वेगळा, पाने वेगळी, प्रत्येक पानाचा रंग वेगळा, गंध वेगळा, ढंग वेगळा,आकार वेगळा.काही पाने स्वतंत्र उमेदवारासारखी एकटी तर काही हातात हात घालून आलेल्या मैत्रिणी सारखी एकत्र. काही पाने लांब तर काही आखूड, काही गर्द हिरवी तर काही पोपटी, आणि काही रंगीबेरंगीसुध्दा. कोवळ्या पानातून नाजूकता डोकावते तर पिकल्या पानातून ताठरता. तरी ही ती हळवी. पाने नेहमी माझे लक्ष वेधून घेतात. त्या पानात मला अनेक आकार दडलेले दिसतात. ते अस्वस्थ करतात. या पानातून काही कलाकृती बनवाव्यात असे वाटू लागले आणि त्यातूनच पानाफुलापासून कोलाजचित्रे बनवू लागले.

 

जास्वंद, पेरू आंबा, तगर, कन्हेरी, पिंपळ, बदाम, इ. विविध प्रकारच्या पानांची मांडणी करून  फुलपाखरू, कासव, मासा, उंदीर,पोपट, इ‌आकार तयार केले आहेत. दोन तीन प्रकारची पाने एकत्र मांडून, काही पानांचा आकार कात्रीने विशिष्ट प्रकारे कापून, कौशल्यपूर्ण कलाकृती तयार केल्या आहेत. यात कोंबडा,  मोर, माकड, हरीण, बगळे, गणपतीही चित्रे तयार केली आहेत. बदामाची पाने हिरवी, तांबूस पिवळी असतात. या छटांचा वापर करून पाणी भरणारी स्त्री, निसर्गचित्र , हत्ती अश्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती तयार केल्या आहेत. विविध प्रकारची पाने वापरून विठ्ठलाचे चित्र तयार केले आहे. वेगवेगळी अशी दिडशेहून अधिक चित्रे मी बनवली आहेत.

निसर्ग नेहमी खुणावत असतो आपल्या ते ओळखता आले पाहिजे. म्हणजे अशा कलाकृती सहज तयार करता येतात.

निसर्गातून कलाकृतीकडे कलाकृतीकडून निसर्गाकडे जाण्याचा प्रवास सुकर होतो.

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈