मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

शिवरायांचे आठवणीत असलेलं चित्र(पट)रूप ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांचं चरित्र आणि चारित्र्य रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा नजरेस पडलं त्याला २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली ! व्ही.शांताराम आणि बाबुराव पेंटर यांचे हे चित्रपट-कार्य ‘सिंहगड’ या शीर्षकाने १९२३ मध्ये चित्रपटगृहात झळकले होते…पण हा चित्रपट मूक होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की सरकारला चित्रपटांवर मनोरंजन कर लावायची कल्पना सुचली…आणि त्यातून उत्तम महसूल प्राप्त होऊ लागला! १९२३ नंतर असे एकूण आठ मूक चित्रपट आले ज्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडले. १९३२ मध्ये व्ही.शांताराम यांनी महाराजांवरील पहिल्या बोलपटाचे दिग्दर्शन केले….आणि या चित्रपटाचेही नाव ‘सिंहगड’ हेच होते. यात मांढरे बंधूंपैकी सूर्यकांत यांनी महाराजांची भूमिका केली होती.    

शिवरायांचे चरित्रच एवढे रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे की आजही त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट तयार होत आहेत आणि होत राहतीलही. २०२४ पर्यंत या चित्रपटांची संख्या ४३ एवढी होती. शिवाय सर्जा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अशांसारख्या चित्रपटांतही शिवराय दिसले.  दरम्यान दोन दूरदर्शन हिंदी मालिका आणि काही मराठी मालिकांमध्ये छत्रपतींचं कलाकारांनी घडवलेलं दर्शन झालं. विषयाचा केंद्रबिंदु असलेली शिवरायांची भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकारासाठी आव्हानात्मक असतेच असते. कारण महाराजांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा आवाकाच अतिविशाल आहे. 

महाराजांची भूमिका करणा-या कलाकारांपैकी अमोल कोल्हे, शंतनु मोघे, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर, रविंद्र महाजनी, महेश मांजरेकर ही काही नावे नजरेसमोर येतात. रितेश देशमुखही लवकरच आपल्याला छत्रपतींच्या भूमिकेत दिसतील. हिंदीत अक्षयकुमारही हे (भलतेच !) धाडस करून बसला आहेच ! या कलाकारांच्या अभिनयक्षमेतेविषयी आणि देखणेपणाविषयी काही शंका नाही आणि प्रेक्षक त्यांचे आभारीही आहेत… वास्तविक छत्रपतीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाविषयी काही वर्णनं उपलब्ध आहेत. यात महाराजांची शारीरिक उंची बेताची होती हे सर्वच वर्णनात आढळते. असो. साधारणत: महाराजांएवढी शारीरिक उंची असणारे अमोल कोल्हे आणि चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे हे कलाकार आपण पाहिले आहेत. परंतु साधारणपणे आजपासून सत्तर वर्षे मागील पिढीतील प्रेक्षकांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जर कोणी अढळ स्थान मिळवलेले असेल तर ते चंद्रकांत मांढरे यांनी. अर्थात चंद्रकांत यांची उंची जास्त होती आणि चेहराही महाराजांच्या उपलब्ध चेह-याशी मिळता-जुळता नव्हता. त्यांचे बंधू सूर्यकांतही छत्रपतींची भूमिका करीत. पण भालजी पेंढारकरांनी चंद्रकांत मांढरेंच्या माध्यमातून ज्या रितीने शिवराय उभे केलेत..त्याला तोड नसावी ! चंद्रकांत यांचं या भूमिकेतील वावरणं अतिशय राजबिंडं, देखणं आहे. संवादफेक अतिशय निर्दोष. अभिनय राजांना साजेसा. एका प्रसंगात महाराज अफझलखानाच्या भेटीस निघालेले आहेत..खान दगा करणारच याची खात्री असल्याने महाराजांनी वाघनखे जवळ बाळगली आहेत. ती वाघनखे पोटाशी लपवून ठेवल्यानंतर एका विशिष्ट निग्रहाने,आत्मविश्वासाने छत्रपती आपली नजर समोर करून पाहतात….अतिशय भेदक भासली चंद्रकांत यांची नजर या प्रसंगातील अभिनयात….वाटलं खुद्द शिवराय बघताहेत मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून! 

हा चित्रपट कृष्णधवल अर्थात ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट होता. पण नंतर नजीकच्याच काळात चंद्रकांत यांचं महाराजांच्या भूमिकेतील रंगीत छायाचित्र उपलब्ध झाले ते या लेखात दिलं आहे. 

बहुदा याच चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी ‘सेट’वर दिग्दर्शक भालजी पेंढारकर आलेले असताना शिवरायांच्या वेशभूषेत असलेल्या चंद्रकांत हे भालजींना नमस्कार करण्यासाठी खाली झुकू पहात असताना भालजींनी त्यांना, “आपण छत्रपतींच्या वेषात आहात..आपण असं कुणाला वंदन करणं योग्य दिसत नाही” अशा आशयाचं सांगितलेलं वाचनात आलं! विषयाचं गांभीर्य जाणणारे भालजींसारखे दिग्दर्शक मराठीला लाभले, हे सुदैवच !   

हरी अनंत..हरी कथा अनंत असं देवाच्या बाबतीत म्हणलं जातं. शिवरायांच्या कथांच्या आणि त्यांच्या रुपांबाबतही असंच म्हणता येईल. मात्र ही रूपं विविध माध्यमांतून साकारणा-या कलाकारांनी विशिष्ट भान बाळगून असावे असे मात्र वाटते. 

जी बाब चित्रपटांची तीच बाब महाराजांच्या चित्रांबाबत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेगवेगळ्या प्रकारची असंख्य चित्र उपलब्ध आहेत. त्यात अनेक कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार चित्रांना चेहरा,उंची आणि वेशभूषा दिलेली दिसते. त्यावरून अनेक प्रतिकृतीही विक्रीसाठी आलेल्या दिसतात. झेंड्यांवरील चित्रेही एका विशिष्ट चेह-याची आढळतात. पण या सर्वांत लक्ष वेधून घेते ते श्रेष्ठ चित्रकार गोपाळ बळवंत कांबळे यांनी १९७४ मध्ये साकारलेलं महाराजांचं तैलचित्र. महाराष्ट्र शासनाने हे अधिकृत चित्र म्हणून स्विकारलेलं आहे आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हेच चित्र प्रदर्शित केलेलं दिसतं. चित्रपटांची मनमोहक भव्य बॅनर्स रंगवण्यात हातखंडा आणि राष्ट्रीय प्रसिद्धी असेलेल्या गोपाळ बळवंत उर्फ जी.कांबळे यांनी हे चित्र काढण्याबद्दल एक पैसाही मोबदला घेतला नव्हता…ते म्हणाले होते…”देवाच्या चित्राचा मोबदला घ्यायचा नसतो!” या अधिकृत चित्रनिर्मितीचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे… (१९७४-२०२४) ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांचे हे चित्र सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जावे, असे वाटते. त्यातून एकवाक्यता दिसेल. असो. 

आपल्या राजांना आपल्या नजरेसमोर आणणा-या सर्व कलाकारांना, लेखकांना, शिव अष्टक संकल्प घेतलेल्या दिग्पाल लांजेकरांसारख्या दिग्दर्शकांना, संगीतकारांना, गायकांना, मूर्तीकारांना, शिल्पकारांना, वक्त्यांना, इतिहासकारांना साष्टांग दंडवत ! प्रातिनिधीक स्वरूपात चंद्रकांतजी मांढरे, भालजी, यांचा चित्रांद्वारे उल्लेख केला आहे. हे केवळ शिव-स्मरणरंजन आहे. ऐतिहासिक प्रमाण असलेलं अभ्यासू लिखाण नाही… 

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈