मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग १ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग १ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अगदी अलीकडे एक अतिशय सुरेख असा हिन्दी कथासंग्रह वाचनात आला. पुस्तकाचं नाव ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’ आणि त्याचे लेखक आहेत, गौतम राजऋषि. वेगळ्या वळणाचं पुस्तकाचं नाव वाचून आतील कथांविषयी कुतूहल निर्माण झालंच होतं. कथा वाचता वाचता जाणवलं, कथा सुरेख आहेत. मार्मिक आहेत पुस्तकाचं नाव सार्थ ठरवणार्‍या आहेत. पुस्तक वाचलं आणि मनात आलं, या पुस्तकाचा अनुवाद करायलाच हवा आणि ‘हिरव्या हास्याचा कोलाज या नावाने मी तो केलाही. 

कोलाज म्हणजे विविध रंगी-बेरंगी तुकड्यांची आकर्षक रचना करून निर्माण केलेली देखणी, मनोहर कलाकृती. मराठीत शीर्षकाचा अनुवाद करायचा झाला, तर ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ म्हणता येईल. यातला हिरवा हा शब्द प्रतिकात्मक आहे. भारतीय सैनिकांची, फौजींची वर्दी म्हणजे गणवेश, हिरवा असतो.  या हिरवी वर्दी धारण करणार्‍या फौजींच्या जीवनावर आधारलेल्या या कथा आहेत. त्यांचे हर्ष-विषाद, विचार-भावना, त्यांच्या एकूण जगण्याचेच काही तुकडे मांडणार्‍या या कथा.  

या  कथांचे लेखक गौतम राजऋषि, भारतीय सेनेत कर्नल आहेत. त्यांचं पोस्टिंग बर्‍याच वेळा काश्मीरच्या आतंकग्रस्त इलाख्यात आणि बर्फाळ अशा उंच पहाडी भागात ‘लाईन ऑफ कंट्रोल’वर झाले आहे. शत्रूबरोबर झालेल्या अनेक चकमकींचा त्यांनी दृढपणे सामना केला आहे. एकदा तर ते गंभीरपणे जखमी झाले होते. कर्नल गौतम राजऋषि हे ‘शौर्य पदक’ आणि ‘सेना मेडल’चे मानकरी आहेत.

त्यांच्या हातातील रायफलीइतकीच त्यांच्या हातातील लेखणीही प्रभावी आहे. जेव्हा ते आपल्या ड्यूटीवर तैनात असतात, तेव्हा तिथे, जेव्हा जेव्हा वेळ होईल, तेव्हा तेव्हा ते लेखणी हाती घेतात. सैनिकी जीवनातील आव्हाने त्यांनी जवळून बघितली आहेत आणि समर्थपणे पेलली आहेत. या दरम्यान घडलेल्या अशा काही घटना आणि व्यक्ती त्यांना भेटल्या नि त्या त्यांच्या कायम स्मरणात राहिल्या. ते अनुभव आणि त्या स्मृतींच्या मग कथा झाल्या. या कथांमधून फौजी जीवनाचे जे दर्शन घडते, ते सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनापेक्षा खूप वेगळे आहे.

त्यांच्या शब्दांचे बोट धरून आपण पोचतो, सुंदर, मनोहर काश्मीर घाटीमध्ये.  भारतातील नंदनवन. काश्मीर. या सुंदर प्रदेशावर सध्या पसरून राहिलेलं आहे दहशतवादाचं अशुभ सावट …. या प्रदेशाचं आणि आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी, इथल्याच बर्फाळ पहाडांवर उभारलेली सैन्याची ठाणी…चौक्या…गस्त घालण्यासाठी नेमलेल्या सैन्याच्या तुकड्या, हिरव्या वर्दीतील सौनिकांचं कष्टमय जीवन, त्यांची सुख-दु:खे, चिंता-काळज्या, विरंगुळ्याचे, हास्या-विनोदाचे दुर्मिळ क्षण, या सार्‍यांचा सुरेख कोलाज म्हणजे ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’.  सैनिकांचा, अधिकार्‍यांचा स्थानिक लोकांशी येणारा संबंध, त्यातून त्यांना जाणवलेले त्यांचे प्रश्न, त्यांची मानसिकता याचे चित्रमय दर्शन, म्हणजे ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज.’ हे दर्शन कधी थेट कथेतून घडते, तर कधी कथेचा बाज घेऊन आलेल्या आठवणी, प्रसंग वर्णन, वार्तांकन या स्वरुयात आपल्यापुढे येते आणि शब्दांचं बोट धरून आपण प्रत्यक्षच पाहू लागतो… ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’

‘हरी मुस्कुराहटों वाला कोलाज’ ही यातली शीर्षक कथा. कथेचा सारांश असा- पीर-पंजालची बर्फाळ शिखरं पार करत सैनिकांना घेऊन चाललेलं विमान एका  दाट हवेच्या पोकळीत सापडून लडखडतं. मृत्यूचा त्या क्षणिक जाणीवेने सगळ्याच्या सगळ्या सैनिकांच्या तोंडून बाहेर पडणारी किंकाळी, बाहेर पडता पडता थांबते. त्या क्षणीही आपल्या वर्दीच्या प्रतिष्ठेची, गौरवाची जाणीव त्यांना होते.

  विमान श्रीनगर हवाई अड्ड्यावर सुखरूप उतरतं. यावेळी सगळ्या सैनिकांचे डोळे आपल्या घरी सोडून आलेल्या प्रियजनांच्या आठवणींचा एक मिळता जुळता कोलाज बनवत आहेत. मेजर मोहित सक्सेनाही आपल्या सव्वा वर्षाच्या मुलीच्या, खुशीच्या आठवणींचा कोलाज त्याला चिकटवू बघतो. तो यंदा दुसर्‍यांदा काश्मीर घाटीत येत आहे.

एअर पोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना, समोर शहीद सोमनाथ शर्माचा भव्य पुतळा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पाकिस्तानकडून येणार्‍या घूसखोरांच्या टोळ्यांनी केलेल्या गोळीबाराचा वर्षाव त्याने एकट्याने आपल्या छातीवर झेलला होता आणि एअर पोर्टचं रक्षण केलं होतं. स्वतंत्र भारताच्या परमवीर चक्राचा तो पहिला मानकरी. सगळे सैनिक त्या पुतळ्याला सॅल्यूट करून पुढे जातात.

पुढे फौजींची निवासाची सोय असलेल्या कॅंपचं वर्णन येतं. हे वर्णन इतकं प्रत्ययकारी आहे की शब्दांवरून डोळे फिरताना आपण त्या कॅंपच्या परिसरात फिरतो आहोत, असं वाटतं.

मोहितला इथे, बर्फाळ पहाडावर वसलेल्या एका छोट्या पण अतिशय महत्वाच्या पोस्टची जबाबदारी सांभाळायची आहे. एकांडी चौकी. सरहद्द पार करून येणार्‍या घुसखोरांवर नजर ठेवणे आणि पोस्टखालून जाणार्‍या महत्वाच्या रस्त्याची सुरक्षा, ही त्याची जबाबदारी.

कर्तव्यदक्ष, ड्यूटीवर जराही ढिलाई खपवून न घेणारा, कठोर मोहित इथे ‘कसाई  मोहित’ म्हणून प्रसिद्ध(?) आहे. मेजर आशीषशी बोलताना त्या मागचं कारणही उलगडतं. मोहित म्हणतो, ‘तीन वर्षापूर्वी मी जेव्हा काश्मीर घाटीत होतो, तेव्हा एकदा आत्मघाती आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात आपले दोन जवान शहीद झाले होते. मागून कळलं की ड्यूटीच्या वेळी एक जवान झोपला होता. त्याचा फायदा घेऊन हल्ला झाला होता. त्यानंतर माझा मी राहिलो नाही. ड्यूटीवर जराही ढिलाई दिसली, तरी माझ्यातला ज्वालामुखी उसळतो.’

ड्यूटीचा पहिला दिवस. प्रचंड थंडी. डोळ्यापुढे जर्मन मेड शक्तीशाली दुर्बीण घेऊन तो खालच्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या जवानांचं निरीक्षण करतोय. सगळे अगदी योग्य पद्धतीने उभे आहेत. रायफलवर मजबूत पकड आहे. पण एका ठिकाणी दुर्बीण थबकते. लांस नायक पूरण चंद शिथील दिसतोय. झाडाला टेकलेला. रायफलचा पट्टा ओघळलेला. त्याच्या चेहर्‍यावर एक मधुर हसू आहे. मोहित संतापतो. ड्रायव्हरला जीप काढायला सांगतो. वाटेत त्याला काळतं, तो लग्नं करून नुकताच ड्यूटीवर परत आलाय.

जीप पूरणजवळ थांबते. मोहितला वाटतं, पूरणला त्याच्या नव्या-नवेल्या बायकोच्या स्वप्नातून जागं करणं क्रूरपणाचं होईल, पण ते आवश्यकच आहे. केवळ कर्तव्यपरायणतेच्याच दृष्टीने नव्हे, तर त्याच्या बायकोच्या भविष्याच्या दृष्टीनेसुद्धा. तिचा भांग कायम भरलेला राहायला हवा. त्यासाठी पूरणला स्वप्नातून जागं करायलाच हवं. मेजरला पाहून पूरण कडक सॅल्यूट ठोकत, योग्य पोझिशनमध्ये येतो. चोरी पकडली गेल्याचे चेहर्‍यावर भाव. मोहित त्याच्या ख्याली-खुशालीची चौकशी करतो. लग्नाची मिठाई मागतो. ’ड्यूटीवर ढिलाई नको’, अशी सूचना देत मोहित निघतो. मेजर साहेबांचा हा बदलेला अवतार बघून, पूरण चकित. एक स्मितहास्य त्याच्या ओठांवर तरळतं. ड्यूटीचा आणखी एक दिवस सुरक्षित पार पडतो आणि मेजर मोहित सक्सेनाच्या कोलाजमध्ये पूरणचं हिरवं हास्य जोडलं जातं. चौकीकडे परतताना तो गुणगुणू लागतो,

हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है

हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है

धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से

मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है     

– क्रमश: भाग १

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈