मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्या भल्या मोठ्या लष्करी विमानाचा महाकाय दरवाजा उघडला. कॅप्टन समरपालसिंग ‘८, राजपुताना रायफल्स’च्या योद्ध्यांची तुकडी घेऊन याच विमानाने दक्षिण सुदान देशात निघाले होते….. संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय शांतिसेनेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी.  

२०११ मध्ये सैन्यात अधिकारी म्हणून भरती झाल्याबरोबर पहिल्याच वर्षी समरपालसिंग साहेबांना सियाचीन मध्ये कर्तव्याची संधी मिळाली होती. आणि त्यानंतर केवळ दोनच वर्षांत त्यांना आंतरराष्ट्रीय शांतिसेनेत भारतीय तुकडीचे प्रमुख म्हणून नेमणूक मिळाली होती. तसा हा एक मोठा बहुमानच!

आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून समरपाल सिंग सैन्यात दाखल झाले होते. समरपाल या नावाचा एक अर्थ आहे युद्धाने किंवा युद्धभूमीने संगोपन केलेलं बालक, अर्थातच लढवय्या! आणि दुसरा अर्थ आहे युद्धगीत! एका योद्ध्याला हे नाव किती शोभून दिसते!

दक्षिण सुदान! जगाच्या पाठीवरील सर्वांत नवा अधिकृत देश! त्यांची निम्मी लोकसंख्या तिशीच्या आतली आहे. ९ जुलै, २०११ रोजी हा देश अस्तित्वात आला आणि १३ जुलै, २०११ रोजी या देशाला सार्वभौम देश म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली. 

सुदानचा इतिहास तसा खूपच रक्तरंजित आहे. इथे आणि एकूणच आफ्रिकेत विविध जमातींच्या टोळ्यांचे राज्य आहे. जगातील अगदीच अविकसित राष्ट्रे या भागात जगतात. जंगल, जनावरे यांच्यावर उपजिविका असते. काही ठिकाणी तेलाचे साठे, खनिज संपत्तीही आहे

परंतू सामान्य लोकांचे पोट जनावरांचे मांस, दूध यांवर जास्त अवलंबून आहे. त्यांच्या उपजिविकेसाठी अनिवार्य असलेल्या जनावरांसाठी गवताची कुरणं आणि पाणी यांसाठी या टोळ्या एकमेकांशी भिडतात. शिवाय चालीरीती, वंशश्रेष्ठत्व या भावना आहेतच. अज्ञान, अंधश्रद्धा, गरीबी, रोगराई मोठ्या प्रमाणात आहे. 

प्रत्येक टोळी हिंसेच्याच जंगली मार्गाने जगत असते. यात आजवर लाखो माणसं कीडामुंगीसारखी मेली आहेत, मुले अनाथ झाली आहेत. भुकेने कहर केला आहे आणि मानवी देहावर गिधाडे, जंगली श्वापदे तुटून पडताना दिसतात. परिस्थिती आपल्या आकलनापलीकडे भयावह आहे! 

सुदानमध्ये तशा अनेक टोळ्या आहेत. परंतू डिंका आणि नुअर या टोळ्या मोठ्या आहेत आणि शस्त्रसज्ज आहेत. त्यात डिंका जास्त शक्तिशाली मानली जाते. जगातील अनेक भागांतून इथे चोरट्या मार्गाने शस्त्रे पाठवली जातात. अगदी आठ-दहा वर्षांच्या पोराच्या हातात एके-४७ सारखी घातक शस्त्रे असतात‌ त्या पोरांच्या स्वत:च्या उंचीएवढी या हत्यारांची उंची आणि वजन असते.

हल्ल्यासाठी जाताना हे सर्व अतिरेकी दारूच्या, अंमली पदार्थांच्या नशेत धुंद असतात. एका टोळीने दुसऱ्या टोळीतील गावांवर सशस्त्र हल्ला चढवायचा, लुटायचं, संपत्ती बळकवायची, जाळपोळ, बलात्कार आणि नरसंहार करायचा…. आणि लहान मुलांचे अपहरण करायचे. ही अपहृत बालके आपली म्हणून सांभाळायची… त्यामुळे टोळीची लोकसंख्या वाढते म्हणून! ‘नरेची केली किती हीन नर…’ या उक्तीची जिवंत प्रचिती म्हणजे यांचा संघर्ष! 

पण जगाची सुरक्षितता, मानवता या दृष्टीकोनातून जगाला या संघर्षापासून स्वत:ला अलिप्त ठेवता येत नाही. म्हणून या संघर्षरत भागांत संयुक्त राष्ट्रसंघाचे सैन्य शांततारक्षणासाठी पाठवले जाते. या शांतिसेनेत भारताचा वाटा खूप मोठा आहे. भारतीय सैन्य आपले सर्वोत्तम अधिकारी आणि जवान आफ्रिकेत पाठवते. जागतिक पातळीवरील सामरिक आणि राजनैतिक समीकरणासाठी हा त्याग अत्यावश्यक ठरतोच शिवाय नैतिक कर्तव्याच्या परिभाषेतही या कृतीचा समावेश होतो. म्हणून आजवर भारतीय सैनिकांनी या मोहिमांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे भाग घेतला असून पाकिस्तान, चीन या शत्रूंशी लढताना दाखवलेलं शौर्य तिथेही दाखवण्यात कसूर केलेली नाही. 

दोन संघर्षरत टोळ्यांमधील संघर्ष थांबवणे आणि इतर मानवतावादी कार्यात हातभार लावणे हे मुख्य काम असते या सेनेचे. परंतू दुर्दैवाने ज्यांच्या रक्षणासाठी हे शूरवीर तिथे तैनात असतात त्यांच्यावरच तिथले राक्षसी टोळीवाले प्राणांतिक हल्ले करतात आणि या वीरांचे बळी जातात! 

त्यादिवशी भारतात उतरलेल्या त्या लष्करी विमानातूनच आपले सैनिक दक्षिण सुदानकडे समरपालसिंग साहेबांच्या नेतृत्वात झेपावणार होते. पण या दिवशी समरपाल साहेबांकडे आणखी एक जबाबदारी दिली गेली होती…… दक्षिण सुदानवरून आलेलं अतिशय महत्त्वाचे काही सन्मानाने ताब्यात घेणे! 

कोणत्याही भारतीय खांद्यांना पृथ्वीपेक्षाही जड होतील अशा लाकडी पेट्या….. एक भारतीय लष्करी अधिकारी आणि चार लष्करी जवानांच्या शवपेट्या! ज्या विमानातून या शवपेट्या आल्या आणि जेथून या शवपेट्या आल्या… त्याच विमानातून त्याच ठिकाणी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी ८, राजपुताना रायफल्सचे शेकडो जवान निघालेले होते… शिस्तीत, एका रांगेत आणि शस्त्रसज्ज! 

डिसेंबर, २०१३. लेफ्टनंट कर्नल महिपालसिंग राठौर हे त्यावेळी शांतिसेनेच्या तुकडीतील भारतीय सैन्याचे नेतृत्व करीत होते. महिपालसिंग साहेबांचा तेथील कार्यकाल समाप्त होत आलेला असतानाच त्यांना आणखी एक महिना कर्तव्यावर राहण्याचा आदेश मिळाला होता. अफ्रिकन बंडखोरांबरोबर एका आठवड्यापूर्वी झालेल्या चकमकीत ते थोडक्यात बचावले होते. 

आणि आज…. त्यांच्या समवेत असलेल्या आणि जंगलातून जात असलेल्या ३२ सैनिकांचा समावेश असलेल्या वाहनताफ्यावर २०० सशस्त्र अतिरेक्यांच्या टोळीने अचानक मोठा हल्ला चढवला! तुफान गोळीबार होत असताना महिपालसिंग साहेबांनी आणि सोबतच्या भारतीय जवानांनी प्रतिकारास आरंभ केला. साहेबांनी एक दोन नव्हे तर तब्बल बारा अतिरेकी ठार मारले! साहेब रायफल मधील मॅगझीन बदलत असताना त्यांच्यावर अगदी समोरून अतिरेक्याने गोळ्या झाडल्या, त्यातील काही साहेबांच्या छातीत उजव्या बाजूने घुसून बाहेर पडल्या. त्यांच्यापासून केवळ तीस मीटर्सच्या अंतरावरील नर्सिंग असिस्टंट त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत साहेबांची जीवनज्योत त्या परकीय युद्धभूमीवर मालवली होती. 

महिपालसिंग साहेबांनी कारगिल संघर्षातही मर्दुमकी गाजवली होती. साहेबांसमवेत असलेले नायब सुबेदार शिवकुमार पाल, हवालदार हिरालाल, हवालदार भरत सिंग आणि शिपाई नंदकिशोर हे सुद्धा वीरगतीस प्राप्त झाले! 

महिपालसिंग साहेबांचा एक मुलगा पुढे एन.डी.ए. मधून लष्करी अधिकारी झाला तर मुलगी हवाईदलात फ्लाईट लेफ्टनंट झाली. त्यांची सैनिकी परंपरा पुढे सुरू आहे…. हिंदुस्थानाला शूरवीरांची खाण म्हणतात ते खरेच !

त्या महाकाय विमानाचा कार्गोचा दरवाजा उघडला गेला… कॅप्टन समरपाल लगबगीने पुढे झाले. त्यांनी शवपेट्यांसोबत आलेल्या जवानांच्या डोळ्यांत पाहिले…. आसवं वहात नव्हती पण ज्वालामुखीत खदखदणाऱ्या लाव्ह्यासारखी उचंबळत मात्र होती…… जवानांची हृदयं जखमी होती….. पण भारतीय सैन्याची शान राखताना बलिदान दिलेल्या सहकाऱ्यांविषयी अत्यंत आदराची भावनाही दिसत होती प्रत्येकाच्या हालचालीत. 

विमानातून शवपेटया सन्मानाने खाली उतरवल्या गेल्या… हुतात्मा वीरांना श्रध्दांजली वाहिली गेली आणि सैनिकांची ही तुकडी त्याच विमानात स्वार झाली…. मृत्यूशी झुंजायला… आदेशाचं पालन करायला. यात आपण मरू, आई-वडील निपुत्रिक होतील, पत्नी विधवा होईल, मुलं अनाथ होतील…. त्याला इलाज नाही! सैनिक बलिदानासाठीच तर निर्माण झालेला असतो.. इथं भावनांपेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ! 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈