मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी मातीतलं शिल्पगीतरामायण ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी मातीतलं शिल्पगीतरामायण ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ग.दि.मां.नी शब्दांचं रामायण बाबुजी सुधीर फडके यांच्या स्वरांतून अमर करून ठेवलं. हे शब्द जोवर मराठी माणूस या जगतात असेल तोवर नादब्रम्हांडात गुंजत राहतील. आधुनिक वाल्मिकी म्हणून कीर्ती प्राप्त झालेले ग.दि.मा.मराठी मातीत होऊन गेले याचा मराठी माणूस म्हणून अभिमान वाटतो. 

शब्दांना भाषेच्या मर्यादा पडतात हे प्रभूंना ठाऊक असावे म्हणून त्यांनी चित्रांना, शिल्पांना, सूरांना, रंगांना शब्दांपेक्षा अधिक पटीने व्यापक बनवले! पाषाणात,मृत्तिकेत आकाराला आलेली शिल्पं तर जणू सहस्रवदनांनी आपली कथा ऐकवत असतात आणि जणू दाखवतही असतात. 

तुलना करणं मोठ्या धाडसाचं असलं तरी गदिमांनंतर प्रभू रामचंद्रांची कथा मराठीत आणि गाण्यात  सांगण्याचं भाग्य कित्येक वर्षांनंतर एका मराठी माणसाला लाभावं हा मोठा योगायोग…! 

पण यावेळी कथा शब्दांतून नव्हे तर शिल्पांतून मूर्तीमंत समोर उभी राहणार आहे. चित्रांतून प्रतिमा उभ्या राहतील, त्या चित्रांवर आधारित शिल्पं मातीतून घडतील आणि या शिल्पांचे साचे तयार होतील आणि या साच्यांबरहुकूम पाषाणांतून मूर्ती उभ्या राहतील….रामललांच्या, प्रभु श्री रामचंद्रांच्या भव्यदिव्य जन्मस्थान मंदिराभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गावर ! प्रभुंसह सीतामाई,बंधू लक्ष्मणजी,भरतजी,भक्तश्रेष्ठ हनुमानजी यांचे   दर्शन घेऊन भाविक मंदिर प्रदक्षिणा करायला निघतील तेव्हा ते प्रत्यक्ष रामायण अनुभवत, बघत पुढे पुढे जात राहतील आणि पुन्हा फिरून त्या रघुरायाच्या सामोरे उभे राहतील.

प्रभुंचा जन्म ते त्यांनी वनवास संपवून अयोध्येत परत येणे ह्या दरम्यानची सर्व कथा सुमारे शंभर शिल्पस्वरूपात सादर करणे ही कल्पनाच मुळात मोठी सुरेख आहे. मंदिर प्रदक्षिणा ही दर्शनाएवढीच महत्त्वाची मानली जाते. एका अर्थाने भक्त देवाला आपल्या तनमनात साठवून घेत घेत त्याच्या राऊळाभोवतीचं चैतन्य देहात साठवून घेत असतो आणि ते घेऊन आपल्या जीवनप्रवासात रममाण होत असतो. यासाठी ही शिल्पं घडवणारे हातही तेवढेच तोलामोलाचे पाहिजेत…म्हणून श्री राम मंदिर निर्माण करणा-या ज्येष्ठ-श्रेष्ठांनी देशभरातून हजारभर कलाकारांना आमंत्रित केले. प्रसिद्ध चित्रकार श्री.वासुदेव कामत यांनी ही शंभर चित्रे काढून तयार ठेवली आहेत. या चित्रांवरून हुबेहुब त्रिमिती मॉडेल्स तयार करायची आणि या मॉडेल्सबरहुकूम पाषाणांतून सर्व शिल्प घडवून घ्यायची अशी योजना होती. सर्वच कलाकारांनी देवाची सेवा म्हणून अक्षरश: जीव ओतून काम केले. पण प्रभुंचा प्रसाद यापैकी कुणा एकालाच मिळायचा होता… त्यासाठी प्रभुंनी मराठी मातीतल्या, मातीतून सृष्टी निर्माण करण्याची अदभूत कला अंगी असणा-या एका नम्र मराठी कलाकाराची निवड केली… प्रमोद दत्तात्रय कांबळे हे या दैववंताचे नाव… मुक्काम अहमदनगर ! 

गावाच्या नावाप्रमाणेच वागण्यात,बोलण्यात कोणतेही कानामात्रे, उकार, वेलांट्या,अनुस्वार नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद कांबळे. वडील दत्तात्रय कलाशिक्षक आणि दत्तभक्तानुग्रहित. प्रमोद कांबळे यांनी अत्यंत हलाखीच्या स्थितीतून पुढे येत मायानगरी मुंबईत चित्रकलेची-शिल्पकलेची जादू दाखवली. पुढे कर्मभूमी अहमदनगर मध्ये परतून कलाविश्व निर्माण केलं. प्रभू रामचंद्रांचं पूर्णाकृती चित्र असं जिवंत केलं  होतं की प्रभुंच्या चित्रातील त्यांच्या गळ्यातील यज्ञोपवीतातला धागा चिमण्या तोडून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या. प्रमोदजींचा कलाप्रवास हा स्वतंत्र लेखनाचा आणि चर्चेचा विषय आहे.   

नानाजी देशमुख आणि तत्कालीन राष्ट्रपती महोदय अब्दुल कलाम साहेबांची शाबासकीची थाप पाठीवर पडलेला कलाकार काही सामान्य असेल काय? भारतीय लष्कराचा पहिल्या पसंतीचा शिल्पकार असणंही काही कमी महत्त्वाचं नाही. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा आवडीचा मूर्तीकार असणं, आंतराराष्ट्रीय किर्ती मिळवत शेकडो हातांना काम आणि नवोदित कलाकारांना घडवणं हेही सोपे काम नाही. आयुष्यभर कमावलेले सारे कलावैभव स्टुडिओला लागलेल्या भयावह आगीत डोळ्यांसमोर जळून राख होताना पाहूनही पुन्हा त्या राखेतून ताकदीनं उभा राहणारा हा कलाकार… प्रमोद कांबळे. यांच्या हातातील मातीतून आपल्या प्रभुंचा जीवनालेख पाषाणातील शिल्पांमधून सगुण साकार होणार आहे.. याचा तमाम मराठीजनांना अभिमान वाटेलच आणि प्रभुरामचंद्रांप्रतीच्या भक्तिभावाने भरलेली आणि भारलेली हृदयं प्रमोदजी कांबळेंना आशीर्वाद आणि शुभेच्छा देतीलच, यात शंका नाही. पुढील वर्षी प्रभुंचे मंदिर दर्शनासाठी उघडेल… कोटयवधी भक्त प्रदक्षिणा मार्गावर चालत असतील…एका मराठी कलाकाराच्या कलाविष्कारातून साकारलेली रामकथा… शिल्पांतून ऐकू येत असलेलं गीतरामायण… ते डोळ्यांत साठवत साठवत पुढे जाताना म्हणतील..जय श्री राम… राम प्रभु की सभ्यता, दिव्यता का ध्यान करिये ! 

(अहमदनगर येथील सुप्रसिद्ध चित्र-शिल्पकार श्री प्रमोद दत्तात्र्य कांबळे यांना अयोध्येतील श्री राममंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर उभारण्यात येणार असलेल्या पाषाण-शिल्पांच्या मातीतल्या थ्रीडी मॉडेल्स बनवून देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अनेक दूरचित्रवाहिन्या, वृत्तपत्रे यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. हा लेख मी सहज परंतू मराठी माणसाच्या अभिमानाने लिहिला आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈