मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-२ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-२ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

७. आदित्य एल-१ वरील वैज्ञानिक अभिभार

सूर्याचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी या मोहिमेत सात अभिभारांच्या संचाचा समावेश करण्यात आला आहे.

अ )दृश्यमान उत्सर्जन रेषा किरिटालेख (Visible Emission Line Coronagraph- VELC) हा अभिभार प्रभामंडल आणि प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection- CME) गतीशीलतेचा अभ्यास करणार आहे.

ब ) सौर अतिनील प्रतिमाग्राहक दुर्बीण ( Solar Ultra-violet Imaging Telescope – SUIT)

हा अभिभार निकट अतिनील (near infra-red) वर्णपटात सूर्याच्या दीप्तीमंडल (photosphere) व वर्णमंडल (chromosphere) यांच्या प्रतिमा घेईल व निकट अतिनील वर्णपटातच सौर विकिरणाच्या  (solar irradiance)  फेरबदलांची मोजणी करेल.

क,ड ) आदित्य सौरवारे कण प्रयोग (Aditya Solar-wind Particle Experiment- ASPEX) आणि आदित्यसाठीचा प्लाविका विश्लेषक संच (Plasma Analyser Packge for Aditya- PAPA)

हे अभिभार सौर वारे व ऊर्जावान आयन्स (energetic ions) व त्यांचे वितरण (distribution) यांचा अभ्यास करतील.

इ, फ ) सौर निम्न ऊर्जा क्ष किरण वर्णपटमापक (Solar Low Energy X-ray Spectrometer – SoLEXS) आणि उच्च ऊर्जा एल-१ परिभ्रमणीय क्ष-किरण वर्णपटमापक (High Energy L1 Orbiting X-ray Spectroscope अर्थात HEL1OS)

हे अभिभार सूर्यापासून निघणाऱ्या क्ष किरणांच्या उद्रेकांचा विस्तृत क्ष-किरण ऊर्जा श्रेणीत अभ्यास करतील.

ग ) चुंबकीयक्षेत्रमापक (Magnetometer)

 हा अभिभार L-१ बिंदूच्या ठिकाणी अंतर्ग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजेल.

आदित्य एल – १ वरील सर्व अभिभार संपूर्णपणे स्वदेशी असून ते देशभरातील विविध प्रयोगशाळांद्वारा विकसित केले गेले आहेत. बेंगलोर स्थित भारतीय खगोल भौतिकी संस्थेने VELC उपकरण विकसित केले आहे. पुणे स्थित आंतर विद्यापीठ खागोलशास्त्र व खगोल भौतिकी केंद्राने SUIT हे उपकरण विकसित केले आहे. अहमदाबाद स्थित भौतिक संशोधन प्रयोगशाळेने ASPEX हे उपकरण विकसित केले आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरमच्या अंतराळ भौतिकी प्रयोगशाळेने PAPA हा अभिभार विकसित केला आहे. बेंगलोर स्थित यू. आर. राव उपग्रह केंद्राने SoLEXS व HEL1OS हे अभिभार विकसित केले आहेत. तर बेंगलोर स्थित इलेक्ट्रो ऑप्टिक्स प्रणाली प्रयोगशाळेने Magnetometer हा अभिभार विकसित केला आहे. हे सर्व अभिभार इस्रोच्या विविध केंद्राच्या निकट सहकार्याने विकसित करण्यात आले आहेत.

लॅगरेंज बिंदू – 

दोन पिंडांच्या गुरुत्वाकर्षणीय प्रणालीसाठी लॅगरेंजबिंदू असे बिंदू आहेत जेथे एखादी लहान वस्तू ठेवल्यास ती तेथे स्थिर राहते. दोन पिंडांच्या प्रणालीसाठी, जसे की सूर्य व पृथ्वी, अंतराळातील हे बिंदू अंतराळयानाद्वारा कमीत कमी इंधन वापरून ते स्थिर ठेवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या लॅगरेंज बिंदूला दोन मोठ्या वस्तूंमधील गुरुत्वाकर्षणीय बल हे लहान वस्तूला त्यांच्याबरोबर जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अपकेंद्रीय बलाशी तुल्यबळ असते. द्विपिंड गुरुत्वाकर्षणीय प्रणालीसाठी एकंदर पाच लॅगरेंज बिंदू असतात व ते एल १, एल २,एल ३, एल ४, एल ५ असे ओळखले जातात. एल १ हा लॅगरेंज बिंदू सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये, त्यांना जोडणाऱ्या रेषेवर असतो व त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतराच्या एक टक्का एवढे असते. 

९.आदित्य एल-१ चे प्रक्षेपण व त्याचे एल-१ पर्यंतचे मार्गक्रमण :

इस्त्रोद्वारा आदित्य एल -१ मोहिमेचे प्रक्षेपण पीएसएलव्ही प्रक्षेपका द्वारा सतीश धवन अंतरिक्ष केंद्र -शार (SDSC-SHAR) श्रीहरीकोटा येथून ऑगस्ट २०२३ मध्ये केले जाईल. सुरुवातीला अंतराळयान पृथ्वी समीप कक्षेमध्ये (Low Earth Orbit-LEO) स्थित केले जाईल. नंतर कक्षा जास्त लंबवर्तुळाकार (elliptical) केली जाईल. त्यानंतर यानावर असणाऱ्या प्रणोदन प्रणालीचा (propulsion system) उपयोग करून त्याला एल-१ कडे प्रक्षेपत केले जाईल. जसजसे यान एल -१ कडे जात जाईल तसतसे ते पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावातून (Gravitational Sphere Of Influence) बाहेर पडेल. गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावा बाहेर पडल्यावर पर्यटन टप्पा (cruse stage) सुरू होईल व सरते शेवटी यान एल-१ भोवतालच्या मोठ्या आभासी कक्षेत अंत:क्षेपित केले जाईल प्रक्षेपणापासून ते एल-१ मध्ये अंत:क्षेपित केला जाण्याचा काळ हा चार महिन्यांचा असेल.

१०)अंतराळातून सूर्याचा अभ्यास का करायचा? 

सूर्य विविध तरंग लहरींमध्ये प्रकाश उत्सर्जित करीत असतो. त्याबरोबरच तो अनेक ऊर्जा भरीत कण व चुंबकीय क्षेत्र यांचेही उत्सर्जन करीत असतो. पृथ्वी भोवतालचे वातावरण त्याचप्रमाणे तिचे चुंबकीय क्षेत्र सूर्यापासून उत्सर्जित झालेल्या हानिकारक लांबींच्या तरंग लहरी, सौरकण व सौरचुंबकीय क्षेत्र यांसाठी ढाल म्हणून काम करतात. सूर्यापासून निघणारी प्रारणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे पृथ्वीवरील उपकरणांद्वारे त्या प्रारणांचा शोध घेता येणार नाही आणि या प्रारणांच्या मदतीने केला जाणारा सूर्याचा अभ्यास करता येणार नाही. परंतु पृथ्वीपासून दूर म्हणजे अंतराळातून निरीक्षण करून या प्रारणांच्या मदतीने सूर्याचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे सौरवाऱ्याचे कण आणि सूर्यापासून प्रसारित होणारे चुंबकीय क्षेत्र आंतर्ग्रहीय अवकाशातून प्रसारित होताना त्याचे मोजमाप करण्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होणार नाही अशा जागेची आवश्यकता भासते. यासाठी सूर्याचा अभ्यास अंतराळातून करणे श्रेयस्कर असते.

११)आदित्य एल-१ मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची परिपूर्ण मोहीम आहे का?

या प्रश्नाचे स्वाभाविक उत्तर ‘नाही’ असेच आहे. हे उत्तर फक्त आदित्य एल-१ साठीच खरे नाही तर इतर कोणत्याही अंतराळ मोहिमेसाठी ते तितकेच खरे आहे. याचे कारण अवकाशात वैज्ञानिक अभिभार वाहून नेणाऱ्या यानाला वस्तुमान, ऊर्जा व आकारमान यांच्या मर्यादा असतात. त्यामुळे यानावर मर्यादित क्षमतेच्या मर्यादित उपकरणांचा संच पाठवता येतो. आदित्य एल-१ च्या बाबतीत सर्व निरीक्षणे लॅगरेंज बिंदू एल-१ या ठिकाणाहूनच केली जाणार आहेत. उदाहरणार्थ सूर्यापासून निघणारी प्रारणे, चुंबकीय क्षेत्र, सौरवारे आदि गोष्टी बहुदैशीक असतात.  त्यामुळे यांपासून सर्व बाजूंनी वितरित होणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप आदित्य एल-१ द्वारा करता येणार नाही.  आणखी एक लॅगरेंज बिंदू जो एल-५ म्हणून ओळखला जातो तो पृथ्वीकडे येणाऱ्या  प्रभामंडलीय वस्तुमान उत्सर्जन आणि अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासासाठी सुयोग्य बिंदू आहे. तसेच सूर्याच्या ध्रुवबिंदूंचा अभ्यास आपल्या तंत्रज्ञानातील मर्यादांमुळे म्हणावा तेवढा झालेला नाही. सूर्याच्या ध्रुव प्रदेशातील गतिशीलता व चुंबकीय क्षेत्र हे सौरघटनाचक्रे निर्माण होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असे मानले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्याच्या अंतरंगात व त्याच्याभोवती घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्यासाठी विविध तरंगलांबींमध्ये बाहेर पडणाऱ्या सौर प्रारणांच्या ध्रुवीकरणांची निरीक्षणे करणे आवश्यक आहे, जे आदित्य एल-१ करू शकणार नाही.

– समाप्त – 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈