ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात — किंवा — त्या तरुतळी विसरले गीत — तसेच —

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे — किंवा — आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको —

– अशी एकाहून एक सुंदर, तरल भावगीते, आणि हळुवार भावनांनी बहरलेली प्रेमगीते लिहिणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार श्री. वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा आज स्मृतिदिन.  (ऑक्टोबर ६, १९१३ – सप्टेंबर ८, १९९१) 

श्री. कांत यांचा जन्म नांदेड येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे झाले. पण त्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अर्थात त्यांच्या काव्यप्रतिभेमध्ये त्यामुळे काहीच फरक पडला नाही आणि उणीव तर अजिबातच राहिली नाही असे आवर्जून सांगायला हवे.  

साधारण १९६० आणि ७० च्या दशकात मराठीमध्ये “ भावगीत “ हा भावप्रधान काव्यरचनेचा प्रकार– जो खरंतर खूप पूर्वीपासूनच ‘ भावगीत ‘ हे नामानिधान न लावता लिहिला जात होता – तो रसिकांपर्यंत विशेषत्वाने पोहोचला, रुळला, लोकप्रिय झाला, आणि रसिकांच्या मनात घट्ट रुजलाही. श्री. वा.रा.कांत हे त्यावेळच्या अग्रगण्य भावगीतकारांपैकी एक अग्रणी. अतिशय आशयगर्भ आणि हळुवार शब्दरचना असणाऱ्या काव्यरचना करणारे अलौकिक प्रतिभावंत, आणि लोकप्रिय कवी आणि गीतकार ही त्यांची अगदी ठळक ओळख सुरुवातीपासूनच निर्माण झाली,आणि आता रसिकांच्या मनात ती कायमची ठसली गेली आहे.   

‘विहंगमाला’ या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते.  त्यानंतर निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी केली होती. (१९३३-१९४५). नंतर त्यांनी निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून जवळपास पंधरा वर्षे कार्यभार सांभाळला. (१९४५- १९६०). त्यानंतर १९६०-१९७० अशी दहा वर्षे भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. शेवटी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रातून ते सेवानिवृत्त झाले.  

श्री. कांत यांचे प्रकाशित साहित्य —-

काव्यसंग्रह 

दोनुली, पहाटतारा, बगळ्यांची माळ, मरणगंध (नाट्यकाव्य), मावळते शब्द, रुद्रवीणा, वाजली विजेची टाळी, वेलांटी, शततारका, सहज लिहिता लिहिता, फटत्कार, मावळते शब्द 

कविता, भावगीते याबरोबरच त्यांनी नाटयलेखन, अनुवाद, समीक्षा , अशाप्रकारचे गद्य लेखनही केले होते. 

‘अभिजात‘, आणि ‘रसाळ वामन‘ अशा टोपण नावांनीही त्यांनी काही लिखाण केलेले होते. 

श्री. कांत यांना पुढील पुरस्कार प्राप्त झाले होते —–

१९६२-६३ ‘वेलांटी ‘ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

१९७७-७८ ‘मरणगंध ‘ या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

१९७९-८० ‘ दोनुली’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत ‘ पुरस्कार

१९८९-९० ‘मावळते शब्द’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत’ पुरस्कार 

तसेच त्यांना पुढील सन्मान देऊन गौरविण्यात आले होते —-

१९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान

१९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान

१९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान

वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -” कविवर्य वा.रा.कांत “ – या नावाने कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे आणि कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.

माझी उन्हे मावळली आहेत …. माझी फुले कोमेजली आहेत 

कालचा प्रकाश, कालचा सुवास…. मात्रा वेलांटीत शोधत आहे 

शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे ? …… 

— अशा भावना जरी त्यांनी स्वतः त्यांच्या अखेरच्या दिवसात व्यक्त केल्या असल्या, तरी खरा मराठी रसिक मात्र तो स्वतः हयात असेपर्यंत श्री. कांत यांची मनाला थेट भिडणारी भावकाव्ये विसरणे अशक्य आहे यात शंका नाही. 

श्री वा. रा. कांत यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी अतिशय भावपूर्ण आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈