सौ. ज्योती विलास जोशी
विविधा
☆ स्त्री… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆
पुरुष ही परमेश्वराची कीर्ती असेल तर स्त्री ही त्याची प्रत्यक्ष मूर्ती आहे. मातृरूपाने तुम्हाला जन्म देणाऱ्या, पत्नी रूपाने तुमच्या जन्माची सोबत करणाऱ्या, कन्या रूपाने तुमच्या ठाई जन्म घेणाऱ्या, तुमच्या आयुष्यात त्या तिन्ही अवस्थेतील कोवळ्या प्रेमाची साक्ष पटवून पुत्र पती आणि पिता या चढत्या पदव्यांना नेणाऱ्या स्त्रीजातीची किंमत अमूल्य आहे. विश्वातल्या प्रेमाच्या, मांगल्याच्या, कोमलतेच्या सौंदर्याच्या व पवित्र्याच्या सार्वभौम सर्वस्वाची स्त्री ही एकरूप विजयपताका आहे. विधात्याने ही सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीला सर्जनशील बनवणाऱ्या स्त्रीला भारतीय संस्कृतीत देवा समान मानले आहे. गणपतीच्या बाजूला उभ्या असणाऱ्या रिद्धी सिद्धींना स्त्रीचा मान मिळाला आहे. तसेच लक्ष्मी सरस्वती दुर्गा याही सन्मानाने विराजित आहेत. नम्रता श्रद्धा आणि ज्ञान या गुणांची जी सगुण मूर्ती आहे त्या स्त्रीचा जिथे आदर गौरव होतो तिथे देवतांनाही आवडीने राहावे असे वाटते.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा अधिकार नाही. त्यामुळे आजही त्यांचे स्थान नगण्यच असल्याने त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होताना दिसतो. कौटुबिंक हिंसाचार, सामाजिक हिंसाचार, शिक्षणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. आपण विज्ञान-तंत्रज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात प्रगती केली परंतु आजही आपले विचार तितके प्रगल्भ नाहीत. ‘ज्याच्या पदरी पाप त्याला मुली आपोआप’ हीच भावना लोकांच्या मनात आहे. म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. कौटुंबिंक हिंसाचारात हुंडाबळी, माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण, मुलगे झाले नाहीत किंवा फक्त मुलीच झाल्या म्हणून शारीरिक त्रास, व्यसनी पती असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ह्या सर्व गोष्टींमुळे स्त्री अक्षरशः पिचून गेली आहे.
स्त्रीचा सन्मान म्हणजे केवळ एक शब्द नाही, तर ती एक विचारसरणी आहे. स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना समान संधी देणे आणि त्यांच्या कार्याचा आदर करणे, यातूनच खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान होतो. पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान असणं, तिच्यावर अन्याय, अत्याचार होणं हे गृहीतच धरलं गेलं होतं, किंबहुना इतक्या वर्षांत ते आता समाजाच्या नसानसात आरपार गेलंय. मात्र त्यातून सुटण्याचा, मुक्तीचा क्षण कोणता असेल? अत्याचाराच्या बाबतीत काही वेळा तर अमानुषतेचा कळस गाठला जातोय. कोणतीही गुलामी सुंदर असू शकत नाही. स्वातंत्र्याचे पाणी स्त्रियांच्या अंगात मुरल्याशिवाय त्यांची स्थिती सुधारणे शक्य नाही असं महर्षी कर्वे म्हणाले होते स्त्री जोवर बलात्काराच्या जोखडातून मुक्त होत नाही तोवर तिचे सौंदर्य खुलणार नाही. स्त्री ही पुरुषाचा गुलाम नसून भागीदार आहे. मधुमेहाप्रमाणे समाजास चिकटलेल्या भोगवादाच्या अग्नीत जेव्हा तिचं अस्तित्व बेचीराख होतं तेव्हा तिला आजही अबला आहे असं म्हणणं भाग पडतं. रोजच नव्याने तिच्यावरच्या अत्याचाराच्या घटना ऐकून कायदा आणि सुव्यवस्था यात बदल होण्याची गरज आहे असं वाटतं. रोजच बहरण्यासाठी जन्म घेतलेली वेल डवरण्याआधी सुकून जाते याची खंत वाटते.
काय उत्तर आहे या सगळ्यांवर?
© सौ ज्योती विलास जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूपच छान वैचारिक लेख आहे