image_print

? विविधा ?

☆ समर्थांनी केलेले गणेश स्तवन…  ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

समर्थानी दासबोधाची रचना लोकविलक्षण पद्धतीने केली आहे. सामान्यपणे विघ्नहर्त्याला नमन करून ग्रंथारंभ केला जातो. परंतु समर्थानी असे न करता दासबोधात नक्की काय आहे ?  समर्थाना नक्की काय सांगायचे आहे, याचे सूतोवाच त्यांनी प्रथम समासात केले आहे. दुसऱ्या समासात मात्र समर्थ जनरीतीप्रमाणे विघ्नहर्त्या गजाननाचे यथार्थ गुणवर्णन करतात, स्तवन करतात. स्तवन करणे म्हणजे फक्त स्तुती करणे नव्हे, तर कृतज्ञता व्यक्त करणे.

श्री गणेश ही आपली आद्यदेवता आहे. कोणत्याही मंगलकार्याची सुरुवात आपण गणेशपूजनानेच करतो. श्री गणेश ओंकारस्वरूप आहे. सृष्टीची उत्पत्ती ओंकारातून झाली असे मानतात. म्हणून कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपतीस आद्यपूजेचा मान दिला जातो. गणपतीची पूजा करून कार्य केल्यास संकटे येत नाहीत अशी भक्तांची श्रद्धा आहे. समर्थानी इथे आधी गणपतीतत्वाचे, अर्थात निर्गुण रूपाचे आणि पुढे  पौराणिक सगुण गणेशरूपाचे गुणवर्णन केले आहे.

श्री गणपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी आहे. सर्वसिद्धी प्राप्त करून देणारा, अज्ञान दूर करणारा, ओंकाररूप असणाऱ्या गणपतीस समर्थ  सर्वप्रथम वंदन करतात. सर्व चराचर सृष्टीचे मूळ असलेल्या गणपतीस ब्रह्मा, विष्णू आणि महेश सुद्धा वंदन करतात. गणपतीची कृपा असेल तर सर्व सिद्धी प्राप्त होतातच आणि काळसुद्धा आपला गुलाम बनतो. तसेच  इतर संकटे गणपतीच्या नुसत्या नामस्मरणाने दूर पळून जातात. समर्थ पुढे अशी प्रार्थना करतात की “ अध्यात्मशास्त्राचा हा ग्रंथ लिहिण्याचा मी संकल्प केला आहे, म्हणून देवा! तुम्ही माझ्या अंतःकरणात नित्य वास करावा, जेणेकरून मला ग्रंथ लिहिणे सुलभ होईल.” या जगात जे जे उत्तम आहे त्याचे भांडार म्हणजे 

श्रीगणेश आहे. विघ्नहर्त्याचे स्मरण करून कोणतेही कर्म केल्यास मनुष्य त्यात नक्कीच यशस्वी होतो.

वक्रतुंड महाकाय कोटीसूर्यसमप्रभ ।

निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

गणपती आपली आद्यदेवता असल्यामुळे त्याचे गुणवर्णन याआधीही प्रत्येकाने आपापल्या प्रतिभेनुसार केले आहे. गणपतीच्या नुसत्या चिंतनानेदेखील आपल्याला समाधान प्राप्त होते. गणपतीचे रूप अत्यंत मनोहर आहे. गणपतीचे नृत्य पाहताना सर्व देव मंत्रमुग्ध होऊन जातात. हा गणपती सदा मदमस्त असतो, परमानंदाने सदा डुलत असतो. त्याचे वदन नेहमीच प्रसन्न असते. ते प्रसन्न वदन पाहून आपण सुद्धा आनंदित होतो. गणपती धिप्पाड आणि सर्वशक्तीमान आहे. त्याचे भाळ विशाल असून त्यावर शेंदूर लावलेला आहे. त्याची सोंड खूप मोठी असून ती सतत हलत असते. ” थबथबां गळती गंडस्थळे।…..” (दासबोध 1.1.11) गणपतीच्या गंडस्थळातून जो ‘मद’ पाझरतो तो ‘ज्ञाना’चा असतो आणि त्याभोवती ‘ज्ञानार्थी भुंगे’ गुंजारव घालत असतात, असा अनेक अधिकारी साधकांचा अनुभव आहे.

गणपतीचे डोळे अतिशय लहान असून तो त्याची सतत उघडझाप करीत असतो. त्याचे कान विशाल आहेत. मस्तकी रत्नजडीत मुकुट आहे , कानात कुंडले धारण केली आहेत आणि त्यातील निलमण्याचा प्रकाश विशेष आकर्षित करीत असतो. गणपतीने नाना अलंकार धारण केलेले आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये सर्व देव आणि देवता ह्या शस्त्रधारी आहेत. गणपती चतुर्भुज असून  त्याने एका हातात परशु आणि दुसऱ्या हातात अंकुश अशी दोन शस्त्रे धारण केली आहेत. तसेच तिसऱ्या हातात कमळ आणि चौथ्या हातात मोदक आहे. आपल्याकडे अहिंसा परमधर्म मानला गेला आहे, पण ही अहिंसा बलवानाची आहे. दुर्बल मनुष्याच्या अहिंसेला काहीही किंमत नसते. बेगडी अहिंसा आपल्याच सर्वनाशाला कारणीभूत ठरते, आणि याचे दुष्परिणाम आपण आज सुद्धा भोगत आहोत. गणपतीने गळ्यात नाना प्रकारचे सुवर्ण अलंकार धारण केलेले आहेत. कंबरेला जिवंत नागाचा वेढा आहे. पितांबर नेसलेला गणपती खूप सुंदर दिसत आहे. टाळ मृदुंगाच्या तालावर गणपती अत्यंत कुशलतेने नृत्य करतो. त्याचे नृत्य पाहणे हा अनुपम्य सोहळा असतो. तसा गणपती शरीराने स्थूल आहे, त्याचे पोट मोठे आहे. पण तरीही तो अत्यंत चपल आहे. तो चालत असताना त्याच्या पायातील पैंजणांची रुणझुण कानाला गोड वाटते. गणपती जिथे जिथे जातो तेथे त्याच्या उपस्थितीमुळे, त्याच्या दिव्य, भरजरी वस्त्रांमुळे त्या सभेला,  जागेला विशेष शोभा प्राप्त होत असते. असा हा गणपती सर्वांगसुंदर आहे. त्याला समर्थ साष्टांग नमस्कार करतात. 

गणपतीच्या सगुण रुपाला विशेष अर्थ आहे असे जाणवते. गणपतीचे  बारीक डोळे मनुष्याला सूक्ष्म अवलोकन करायला सुचवितात. विशाल  कर्ण जास्तीत जास्त ऐकायला शिकवितात. मोठे पोट मानापमान पोटात घ्यायला शिकविते. गणपतीचे मुख हे हत्तीचे आहे. त्यामागे विविध कथा सांगितल्या जातात. एक तर त्याकाळी विज्ञान प्रगत होते असे म्हणता येईल आणि दुसरे म्हणजे एखाद्याला उपजत सौंदर्य नसेल किंवा पुढे अपघाताने ‘विद्रूपता’ प्राप्त झाली, तरी मनुष्य स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो, किर्ती मिळवू शकतो. गणपतीच्या  हातातील शस्त्र भक्ताने  शस्त्रसज्ज असावे आणि अखंड  सावधान असावे असे सुचवितात. कारण तो सेनानायक आहे. पायातील पैंजण मनुष्याच्या अंगी नाना कला (‘कळा’ नव्हे) ) असाव्यात असे सूचित करतात. दैनंदिन व्यवहारात कधी कोणती कला उपयोगी पडेल याचा नेम नाही म्हणून जे जे शक्य ते मनुष्याने शिकले पाहिजे. महाभारतात महापराक्रमी अर्जुनाला ‘बृहन्नडा’ व्हावे लागले होते. गणपती चपळ आहे कारण युद्धात चपळता जास्त कामी येते. गणपतीला मोदक आवडतो. मोदकात असलेले नारळ, गुळ आणि भात हे शरीरासाठी पोषक आहेत, तसेच ते इथल्या मातीत पिकणारे आहे. असे विविध गुण आपण गणपतीच्या सगुणरूपातून आत्मसात करू शकतो. पूर्वी शाळेत सुद्धा सर्वप्रथम “श्री गणेशाय नमः” असेच शिकवत असत.

गणपती शब्द दोन शब्दांचा समूह आहे. गण आणि पती. गण म्हणजे समूह आणि पती याचा अर्थ नेता किंवा सांभाळणारा, संचालन करणारा. म्हणून ज्याला ‘गणपती’ व्हायचे असेल म्हणजे ज्याला समूहाचे, समाजाचे नेतृत्व करायचे असेल त्याने गणपतीची उपासना करावी. समर्थांचा महंत असाच ‘गण’पती आहे. ज्याची बुद्धी मंद असेल त्याने गणपतीची उपासना करावी. गणपती सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि सर्व संकटांचे हरण करणारा आहे.

आजची देशकाल परिस्थिती बघितली तर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, फक्त एकाच देवीची अर्थात भारतमातेची पूजा करण्याची गरज आहे. भारतमातेची पूजा करणे म्हणजे किमान एका सामाजिक उपक्रमात सहभागी होणे. समाजाचे काम करायचे असेल , नेतृत्व करायचे असेल तर गण-पती व्हावे लागेल. किमान गणातील एक ‘ आदर्श सदस्य’ होण्याचा तरी आपण यथाशक्ती प्रयत्न करूया. उत्तम समूहसदस्यच पुढे उत्कृष्ट नेता (गणपती) होऊ शकतो.

जय जय रघुवीर समर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments