सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
विविधा
☆ उजळूया प्रकाश ज्योती… ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
नवरात्रीची सांगता विजयादशमीने झाली. अन् दिवाळीची चाहूल लागली….. आली.. दिवाळी आली… !
मनाने एक हळुवार गिरकी घेतली. ‘ दिवाळी ‘वर्षाचा मोठा, रंगांचा, प्रकाशाचा सण! अनेकविध रंगांचे आकाराचे आकाशदीप नक्षीदार सुंदर रांगोळ्या, अभ्यंगस्नान, नवी कोरी विविध रंगांची सुंदर वस्त्र प्रावरण, झगमगत्या रंगीत दिव्यांच्या माळा, घरात दारात, अंगणात प्रकाशणारे दीप- पणत्या अन् तिखट गोड पदार्थांनी सजलेली तबकं, फुलबाज्या, चक्र, फटाके, सू़ं सूं आवाज करीत आकाशांत झेपणारे बाण, अशी कितीतरी आतिषबाजी, पाहुण्यांची- मित्रमंडळींची वर्दळ, पहाटेच सर्व आवरून, पूजाअर्चा करून देवळात देवाला जायची लगबग.. मग फराळ, पक्वांनाच जेवणं, सगळंच कसं आनंदमय वातावरण अगदी हवंहवंस. !
पूर्वीची दिवाळी अन् -आजची दिवाळी यात फरक आहे तो दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीचा. तरीही, आनंद तोच उत्साह तोच असतो…. दिवाळीला आपल्याकडे एक धार्मिक अधिष्ठान आहे ते पूर्वी इतकंच आजही पाळलं जातं प्रत्येक दिवसाचं धार्मिक महत्त्व असलं तरी सर्वांनी म्हणजे आप्त-स्वकीयांनी एकत्र यावं भेटी घ्याव्या असा हा आनंदाचा सण! वेगवान जीवन चक्रात सगळंच बदलत गेलं. चाळ, वाडे संस्कृती इतिहास जमा होत गेली. सगळ्यांनी मिळून एकत्र सण साजरा करायला जमत नाही. जागा लहान, वेळ कमी यातच सगळं आलं. त्यामुळे मी आणि फक्त माझंच असा विचार घेऊन प्रत्येकाचं किंवा आपल्या छोट्या कुटुंबाचं वेगळं छोटसं वर्तुळ तयार झालं. फ्लॅट संस्कृती आली. आता मनासारखंच घरालाही मोठं प्रशस्त अंगण फारसं दिसत नाही. तरीही आप्तस्वकीय मित्रपरिवार सर्वांना यानिमित्ताने भेटणारे आणि आवर्जून बोलावणारे ही आहेत. घरोघरी घरकुल, किल्ले जरी होत नसले तरी सोसायटीच्या प्रांगणात लहान मोठी मुले -मुली मिळून त्याचा आनंद घेतात अगदी चढाओढीने किल्ले घरकुल बनवतात… आज राजाच्या घरी रोजच दिवाळी असते म्हणतात. तसे आज सगळेच राजे आहेत मनात आलं की तयार पिठापासून तयार पदार्थांपर्यंत अगदी गोड तिखट हवं तसं आणि हवं तेव्हा मिळतं पण, त्यात गृहिणीच्या म्हणजे घरच्या अन्नपूर्णेच्या हाताची चव असते का?.. आमच्या वेळी.. वगैरे असं काहीच म्हणायचं नाही मला कारण काळाप्रमाणे बदल होतच असतात. प्रत्येकाने बदलायलाच हवं. आताच्या गृहिणीला वेळ नसतो पण हौस तर असते तेव्हा, हे आपण समजून घ्यायला हवं… लक्ष्मीपूजन, पाडवा, आजही दणक्यातच साजरे होतात. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचं प्रतीक म्हणजे भाऊबीज. हा दिवाळीतला महत्त्वाचा दिवस. भावाने बहिणीकडे यावं बहिणीने त्याला फराळ अन् सुग्रास भोजन द्यावे. आपल्या भावाला उदंड आयुष्य मिळावं सुख समृद्धी मिळावी. ही देवाला प्रार्थना करीत त्याला ओवाळावं. बालपण आठवावे. मन- मोकळ्या सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात… पण आज ‘ओवाळणं ‘हा एक सोपस्कार झालाय का असंही वाटतं. दोघा बहिण भावांना आपल्या वर्तुळातून वेळ काढणं अवघड होऊ लागलंय. असं का झालं? कधी झालं ? हे प्रश्न तसे अवघडच. हा काळाचा महिमा की, संवादाचा, पैशाचा हे कळेनासं झालंय.
लहानपणी भाऊबीजेला मिळालेली रिबन, नक्षीदार पिना, बांगड्या, यात समाधान असायचं. वडिलांकडून पाडव्याला मिळालेल्या ‘बंद्या’ रुपयांचं भारी अप्रूप वाटायचं. आज ज्येष्ठत्व आलं – वयही उताराला लागलं.. त्यामुळे पूर्वीची दिवाळी व आजची दिवाळी मनात रुंजी घालतेच. तरीही, आज’ ‘प्रकाश- ज्योती’ उजळतांना वाटतं..
खरंच, आजची दिवाळी बदलली आहे का? पण नाही.. सगळं तर तसंच आहे. एवढंच की त्यावेळी एवढा लखलखाट, झगमगाट, डामडौल नव्हता. आज नव्या युगाची ‘नवी दिवाळी ‘तेव्हा सारखी मर्यादित नाही. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम, खास अशी नाटक, सिनेमा असतात. दिवाळी अंकांनी, पुस्तकांचे स्टॉल सजतात. रसिक आवर्जून याचा आनंद घेतात. आमच्यासारख्या ज्येष्ठांना ती पर्वणीच वाटते. तरुण पिढीला नव्या पिढीला सहली सहभोजन असा सुट्टीचा आनंद कुटुंबाबरोबर घेता येतो एरवीच्या धावपळीत ते शक्य होत नाही म्हणून वाटतं सगळंच हरवलं नाही पण जे कुठे उणं वाटतं, बिनसलंय, यासाठी आपल्या मुलांना नातवंडांना नात्यांतील आपलेपणा, पावित्र्य, प्रेम संबंध, टिकवून ठेवण्याची गरज – या गोष्टी आपणच समजावून सांगायला हव्यात. कुटुंब वर्तुळाचा परीघ वाढविल्यानंतरचे फायदे त्यातील आनंद सांगायला हवेत. त्यांना पटले तर आनंदाचं आहे. तसेच समाजाचे ऋण मानून आपल्याबरोबर दुसऱ्याच्या अंगणातही ‘प्रकाशाचा दिवा’ लावणारेही आहेत. संस्था आहेत. त्यांच्याबरोबर सहकार्यासाठी, आपण असायला हवं. ही काळाची चांगली पाऊले आपणही टाकायला हवीत ! यासाठी दिवाळीच योग्य ! अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे. दिव्याने दिवा लावून आपल्याही ज्ञानज्योती’ उजळूयात -. ! याच “दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.. !”
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈