image_print

??

☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆

आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू ‘ मन्मन ‘च्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. यंदा परत दिलीपने आठवण करून दिली आणि आग्रह देखील केला. तु गोखल्यांना एकदा भेटच तुमचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध नक्की संपेल. फार अफलातून गृहस्थ आहेत. मी ठरवले, जाऊयात एकदा हा एव्हडा म्हणतोय तर. खरं म्हणजे सदाशिव पेठेत असा काही उद्योग असेल असे मनाला पटत नव्हते आणि असलाच तर असून असून किती मोठा असेल? असा प्रश्न मला उगीचच पडत होता. कदाचित म्हणूनच माझे पाय तिकडे वळत नव्हते. पण शेवटी मी ठरवले गोखल्यांना भेटायचे. दिलीपला विचारले तुझी ओळख देऊ का? तर दिलीप म्हणाला छे छे मी त्यांना १०-१२ वर्षांपूर्वी भेटलोय ते मला आता ओळखणार देखील नाहीत. शेवटी मी, अरुण नित्सुरे आणि अजय मोघे मन्मनच्या ऑफिसमध्ये धडकलो. स्वागतिकेला गोखल्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले. माझे कार्ड दिले. तिने कार्ड आत नेऊन दिले आणि १० मिनिटात बोलावतील असे सांगितले. आम्ही रिसेप्शनमध्ये वाट पहात बसलो. तेव्हड्यात एक कुरियरवाला आला. त्याने पार्सल स्वागतिकेकडे दिले. बिल दिले आणि निघाला. तोच तिने त्याला परत बोलावले आणि Octroi रिसीट विचारली. तो म्हणाला, “ Octroi भरला नाही, मटेरियल तसंच आणलंय. पण मॅडम octroi भरला नाही म्हणून पैसे पण घेतले नाहीत.” आणि तो वळून जाऊ लागला. रिसेप्शनिस्टने त्याला जरबेने बोलवून घेतले आणि सुनावले, “ हे बघा, octroi भरला नसेल तर ते पार्सल परत घेऊन जा. मी पाठवणाऱ्या कंपनीला कळवते की ह्या कुरियरने परत पार्सल पाठवू नका. हे घेऊन जा आणि octroi भरून आणा.” कुरियरवाल्याला हे नवीन होते. तो बाईंना पटवू लागला, “ बाई, तुमचं काहीतरी वेगळंच. आता मी कुठे भरू octroi? घ्या ना यावेळी.  पुढे बघू.”

“ हे बघा हे चालायचं नाही. मी आत्ताच फोन करते त्यांना ” आणि फोन लावला देखील.

शेवटी होय नाही म्हणता कुरियर ते पार्सल परत घेऊन गेला. बाईंनी पार्सल पाठवणाऱ्या सप्लायारला याची खबर दिली व असे परत होणार नाही याची तंबी दिली. पार्सल परत देताना ‘ मन्मन ‘मधल्या कोणी ते मागवले होते? वेळेत न मिळाल्याने व्यवसायावर काय परिणाम होईल? याचा विचार न करता ते परत पाठवले. 

मी हे सर्व बघत होतो. गोखल्यांच्या कंपनीचे एथिकल वेगळेपण इथेच बघायला मिळाले. मला गोखल्यांचे आत बोलावणे आले आणि स्वागतिकेने स्वत: मला त्यांच्या केबिनपर्यंत सोडले. आत मनोहर गोखल्यांचे दर्शन झाले. वय साधारण सत्तरच्या आसपास, कोकणस्थी गोरेपण आणि चेहऱ्यावर सात्विक शांत भाव असलेले गोखले प्रथम दर्शनीच आवडले. रिसेप्शनिस्टने octroi न भरल्याने पार्सल परत पाठवल्याचे गोखल्यांच्या कानावर घातले. ‘उत्तम केलेस’, असे बाईंचे कौतुक केले आणि माझ्याकडे बघून स्माईल केले व मला बसण्याची खूण केली. मी माझा येण्याचा उद्देश सांगितला की, “आम्ही तुमच्याविषयी खूप ऐकले आहे. एक उत्सुकता म्हणून आपण काय करता हे जाणून घेण्यास आलोय.” त्यांना माझी ओळख सांगितली. असे काही कुणी उत्सुकतेपोटी येईल अशी त्यांना कल्पना नसल्याने आश्चर्य मिश्रित कौतुकाने मला म्हणाले, “ बोला काय माहिती हवी.”

“ हेच की आपण काय करता? प्रॉडक्ट काय? ”

“आम्ही मेडिकल सर्जरीसाठी लागणारी सामग्री बनवतो.” असे म्हणून त्यांनी त्यांचा एक प्रॉडक्ट कॅटलॉग समोर ठेवला. मी इंजिनीअर असल्याने मला फारसे आकलन झाले नाही. पण त्यांनीच हा प्रश्न सोडवला आणि त्यांनी सुरुवात केली.

 “आम्ही orthopedic सर्जरीपासून मेंदूच्या सर्जरीपर्यंत लागणारी सर्व प्रकारची शल्य उपकरणे बनवतो, ज्यामुळे डॉक्टरला शल्यक्रिया करणे सुकर जाते. आम्ही १००-१२५ प्रकारची शल्य उपकरणे बनवतो. देशात तसेच परदेशात देखील वितरीत करतो.” एकंदर मला जे कळले त्यावरून जशी कारखान्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची टूल्स वापरतो तशीच टूल्स एखाद्या सर्जनला ऑपरेशनकरता वापरावी लागतात. एखादे मशीन दुरुस्त करताना ठराविक वेळेत दुरुस्त व्हावे असे इंजिनीअरला बंधन नसते. आज काम अपुरे राहिले तर उद्या करू, आहे काय अन नाही काय. पण माणसाचे हृदय, किडनी अथवा मेंदूची दुरुस्ती करताना, वेळ अतिशय काटेकोरपणे वापरावा लागतो. आज दुरुस्ती झाली नाही –  रुग्णाला तसेच ठेऊन उद्या उरलेली करू, असे चालत नाही. हा महत्वाचा फरक माणूस आणि मशीन दुरुस्त करण्यातला आहे. तसाच इंजिनियर आणि सर्जन यामधला आहे. त्यामुळे शल्यक्रियेची अशी उपकरणे बनवताना अजून एक महत्वाची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे, त्या आयुधामुळे रुग्णास कोणतीही इजा होता कामा नये. एकंदर लक्षात आले की, गोखलेसाहेब आपल्या आकलना आणि आवाक्याच्या पलीकडचे काम करतायत. 

“ तुम्ही इकडे कसे वळलात? ” असे मी विचारले  

“ अहो त्याची मोठी गम्मतच झाली.” श्रोते मिळाल्यामुळे गोखलेसाहेब रंगात आले होते.

“२० वर्षांपूर्वी माझा भाऊ ससूनमध्ये न्युरो सर्जन होता. तो एकदा म्हणाला ‘ अरे मला मेंदूचे ऑपरेशन करताना कवटीतून मेंदू मोकळा करून, कवटी डाव्या हाताने धरून शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे शस्त्रक्रियेस वेळ लागतो आणि आपले काहीतरी चुकले तर? ही मोठी भीती वाटत रहाते. तर तू अशी काही वस्तू कर की ती कवटी अलगद पकडून ठेवेल आणि माझे दोन्ही हात शल्यक्रियेस मोकळे राहतील, जेणेकरून मला नीट काम करता येईल आणि वेळ कमी लागेल. परदेशात अशी उपकरणे मिळतात पण ती फार महाग असतात आणि त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्चही वाढतो आणि तो रुग्णास परवडत नाही.’ मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

९८५००३५०३७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments