image_print

? मनमंजुषेतून ?

☆ लईच_बीजी… सुश्री योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

सध्या हळदी कुंकवाचा सिझन आहे… 

त्यामुळे शाळेतून घरी आलं की आधी मॅसेजेस चेक करावे लागतात की आज किती घरी हळदीकुंकू आहे. मग एक घरी असेल तर ड्रेस, दोनचार घरी असेल तर साडी शोधावी लागते.. 

काय आहे ना…… एका घरासाठी साडी नेसणं म्हणजे बारशासाठी लग्नाची तयारी करण्यासारखं आहे… त्यामुळे मग ड्रेस अडकवायचा.

जर आपल्याला फारच मेकअप वगैरे काहीही करायला वेळ नसेल तर मग तर मी त्या घरी पटापट सहा वाजताच जाऊन यायचं बघते… म्हणजे अगदी सुंदर तयार होऊन आलेल्या बायकाही भेटत नाहीत आणि आपल्याला उगच आपल्याकडे सगळं असून लंकेची पार्वती बनल्याचं दुःखही होत नाही.. 

असो.  पण हळदीकुंकवामुळे ज्या मैत्रिणी गणपतीच्या मिरवणुकीनंतर भेटल्या नव्हत्या त्याही भेटतात आणि त्या भारतातच असल्याची खात्री पटते….. तेवढेच बरे वाटते हो दुसरं काय… 

शिवाय अनेक ठेवणीतल्या साड्यांना हवा लागते नी त्यानिमित्ताने त्या नेसल्या जातात……..

काही मैत्रिणींच्या नवीन साड्यांच्या घड्या मोडल्या जातात…

चांदीची भांडी त्यानिमित्ताने कपाटरुपी जेलमधून बाहेर येतात आणि त्यांना आंघोळ पांघोळ घालून आपण चकाचक करतो… 

तेच ठेवणीतल्या मोठ्या पातेल्याच्या बाबतीतही होतं…. कपाटात वर कुठेतरी पडलेले मोठ मोठे भांडे बाहेर येतात नी चकाचक स्वच्छ होऊन त्यात मसाला दूध खळखळ उकळायला लागतं… 

दार झाडून पुसून स्वच्छ होतं नी तिथे सुंदर रांगोळी काढली जाते… भलेही मग उठताना पायही आखडतात आणि कंबरही… तुटून हातात येतात की काय असं वाटायला लागतं, नी पाच मिनिटं म्हाताऱ्या आज्जीसारखं वाकूनच  चालावं लागतं.. 

हळदीकुंकवाच्या दिवशी पोळ्या सकाळीच केल्या जातात आणि एखादी साधी भाजी किंवा खिचडी होणार हे जगजाहीर असतं.. 

घरातला पुरुष वर्ग दबकत दबकत बुटासकट थेट बेडरूम गाठतो नी तिकडेच आरामात डुलक्या घेतो…. 

…. असं करत करत पावणेदहा होतात आणि आता कुणी राहिलं तर नाही ना?? याचा कानोसा घेत आपण साडी फेडून गाऊन घालतो आणि जेवायला पान घेतलं की टाणकन बेल वाजते… 

“ उशिरच झाला गं जरा “म्हणत मैत्रिण येते नी पुन्हा आपण हळदीकुंकवाचं ताट हाती घेतो…… आणि अशा रितीने साडीपासून सुरु झालेला हळदीकुंकवाचा प्रवास गाऊनवर येऊन संपतो..

संक्रांतीचा हा पर्वकाळ म्हणजे खरंच एक पर्वणीच असते सगळ्या मैत्रिणींना भेटण्याची…… आणि लई म्हणजे लईच बिजी असण्याची…. 

सखी (फक्त महिलांसाठी)

लेखिका – सुश्री योगिता कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments