श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सायीचं पातेलं खरवडून खाणे : एक संस्कार”  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

गेले काही वर्ष हे जाणवतं आहेच आणि वाढतच चाललं आहे. आधीच सांगतो कि माझं बालपण छानपैकी गेलं. दरवर्षी नवीन पुस्तक, दिवाळीला नवीन कपडे, फटाके. सगळ्या सणांना भरपूर पाहुणे आणि गोड-धोड. दारिद्रय वगैरे काही खास सोसावं लागलं नाही. पण तरीही गेल्या २-३ आठवड्यात असे प्रसंग घडले कि हे लिहावं वाटू लागलं.

प्रसंग १ :

हा.. तर परवा एका मित्राकडे गेलो होतो. रात्री सहज गप्पा मारायला. त्याच्या बायकोने छान हापूस आंबे चिरले. अगदी बाठीला लागून चिरले. गोड होते आंबे. आंब्याच्या फोडी खाऊन झाल्या आणि ती ते सगळं टाकायला उठली.

“अहो वाहिनी त्या बाठी राहिल्या आहेत अजून” 

“राहू दे हो भाऊजी इतकी काही गरिबी आली नाही आहे, जाऊदे ते आता. अजून आंबे चिरू का?”

“आहो गरिबीचा प्रश्न नाही, पण अजून गर आहे त्याला. आपल्याला नको पण मुलांना बोलवा. मजेत चोखतील. ”

तेवढ्यात दुसऱ्या मित्राची बायको म्हणाली “नको.. सगळं तोंड बरबटून ठेवतील… मग उठा.. त्यांना धुवा.. जावु देना… छान गप्पा रंगल्या आहेत”

मला पुढच्या गप्पा नीट ऐकूच आल्या नाहीत.

☆ ☆ ☆ ☆

 प्रसंग २:

उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून आम्ही चार मित्र फॅमिलीसहित महाबळेश्वर ला गेलो होतो. हॉटेल मध्ये सकाळचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता. आम्ही ब्रेकफास्ट घेत होतो. मित्र त्याच्या मुलाला सांगत होता. “सगळं भरभरून घेऊन ठेव, मी परत परत उठुन रांगेत उभा रहाणार नाही” त्याचं ८ वर्षाचं कार्ट दोन हातात दोन डिश घेऊन चालत होत आणि मित्र आपल्याबरोबर त्याची डिश भरून देत होता. टेबलावर तो मुलगा आला तेव्हा त्याच्या डिश मध्ये पुरी भाजी, मेदू वडा, चिकन सॉसेज, फ्रुटस, ऑम्लेट, पाव, अमूल बटर, कॉंफ्लेक्स, मंचुरियन होते. मित्राने त्याला बसवले आणि हातातला ग्लास भर ज्यूस त्याच्यासमोर ठेवला.

अजून दहा मिनिटात त्या मित्राची बायको शेजारच्या टेबलावरून त्यांच्या मुलाला ओरडत होती. “जाईल तेवढंच खा, बाकीचं टाकून दे”

आमच्याकडे वळून म्हणाली.. “नाहीतर खा-खा खातील आणि मग पोट धरून बसतील. दोन दिवस सुट्टी मिळालीये त्यात यांच्या मागे धावायची माझी अजिबात इच्छा नाही आहे. ” 

तसही आम्ही आराम करायला गेलो होतो. पुढचा काही प्लॅन नव्हता. मुलाला २-३ वेळा हवं तेवढच घेऊन दिलं असत तर काही बिघडलं नसतं. वाया तरी गेलं नसतं.. असो.

☆ ☆ ☆ ☆

प्रसंग ३ :

पिझ्झा पार्टी होती. तुडुंब पिझ्झा खाऊन झाला. मी खोकी गोळा करायला उठलो तर प्रत्येक खोक्यात पिझ्य्यांच्या कडांचा गोल केलेला होता. मागवलेल्या ६ 

पिझ्झानपैकी सगळे गोल पूर्ण करायला ५ कडा कमी होत्या. (त्यातल्या दोन माझ्या पोटात होत्या आणि अजून ३ कडांना माझ्यासारखा कोणीतरी धनी होता). म्हणजे बहुतेकांनी कडा खाल्ल्या नव्हत्या. खरं तर.. घरापासून ५ मि वर पिझ्झ्याचं दुकान आहे आणि आम्ही पण आल्याआल्या खाल्ला होता त्यामुळे कडा कडक वैगैरे होण्याचा पण चान्स नव्हता.

☆ ☆ ☆ ☆

प्रसंग ४ :

परवा दोन मित्र घरी राहायला आले होते. बायकोने सकाळचा चहा केला आणि सवयीने तिने दुधाचं रिकामं पातेलं आणि बारीक कड असलेला चमचा माझ्या पुढ्यात ठेवला.

एका मित्राने विचारलं “हे काय”

“विचारू नका भाऊजी. तुमच्या मित्राच्या घरची परंपरा आहे. सकाळी साय वाडग्यात काढायची. मग ते नुसतं दूध दुसऱ्या पातेल्यात गाळायचं. गाळणीत आलेली थोडीशी साय पण सायीच्या वाडग्यात टाकायची आणि मग कर्त्या पुरुषाच्या पुढ्यात दुधाचं रिकामं पातेलं खरवडायला द्यायचं….. मी आहे म्हणून या परंपरा पाळत टिकली आहे. दुसरी असती तर कधीच कंटाळून सोडून गेली असती”

सगळे हसले.

एका मित्राच्या बायकोने चिचारले. “पण मग तुम्ही सायीचे काय करता?”

“दही -लोणी – तूप”. “मग ती बेरी खायचा पण एक कार्यक्रम असतो.. सुंठ… पिठीसाखर…. काही विचारू नको”

माझ्या बायको ने विचारलं “तुम्ही काय करता सायीचं?”

“आम्ही चहाच्या गाळण्यातच दूध गाळतो मग साय पडते त्या गाळण्यातच.. उगाच दोन गाळणी कोण करणार”

“आणि मग तूप ?”

“चितळ्यांचं”

☆ ☆ ☆ ☆

तोपर्यंत सायीचं पातेलं खरवडण्यात माझी ब्रम्हानंदी टाळी लागली होती. अशी साय खरवडताना माझी समाधी लागते. त्या चमच्या पातेल्याचा होणार कुर -कुर आवाज माझ्या कानीहि पडत नाही.

साय खरवडता खरवडता मी भूतकाळात गेलो होतो. माझे आजोबा सायीचं पातेलं खायचे, मग बाबा आणि आता मी (मी नसेन तर मुलं खातात आता). घरात दूध-दुभतं कधीच कमी नव्हतं पण काहीही टाकायचं नाही. पूर्णपणे संपवायचं हे संस्कार अशा सायीच्या पातेल्यातूनच झाले. आजी तर बेरीच रिकामं पातेलं पाणी घालून तापवायची, पाण्यावर तुपाचा तवंग दाटून यायचा तो काढून आजीचं निरांजन त्यावर दोन दिवस तेवायच.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आमरस काढून झाला कि मामा सगळ्यांना बाठी चोखायला द्यायचा. ज्याची सगळ्यात स्वच्छ त्याला १ वाटी एक्सट्रा आमरस ठरलेला.

रिझल्ट लागला कि सगळ्या जुन्या वह्यातील कोरी पाने फाडायची. बाबांना दाखवायची आणि मग त्याच्या बाइंडिंगच्या वह्या करायच्या. पुढच्यावर्षी शाळेला सगळ्या नवीन मिळायच्या पण बाइंडिंगच्या वह्या रफ वर्क / शुद्धलेखन यासाठी वापरायच्या.

घरी किराणाच्या पुड्या किंवा फुलपुडी यायची. आजीचं दोऱ्याचं एक बंडल होतं. कुठलीही पुडी आली कि आजी त्याचा दोरा सोडून त्या बंडलाबरोबर गुंडाळून टाकायची आणि आजोबा तो पेपर परत व्यवस्थित घडी करून रद्दी च्या पेपरात ठेवून द्यायचे. दोऱ्याचं बंडल नंतर हार/माळ करायला कामाला यायचे.

Reuse-recycle साठी आम्हला कधी शाळेत प्रोजेक्ट करावेच लागले नाहीत. टाकू नये – हवं तेवढंच घ्यावं, कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर वापर करावा हा संस्कार आहे. त्याचा तुमच्या पैशाशी, गरिबीशी, स्टेटस शी, शिक्षणाशी काही संबंध नाही. असं वागणं म्हणजे चिंधीगिरी, कंजूषपणा नव्हे. हा श्रीमंत “मध्यमवर्गीय” संस्कार आहे आणि त्या बाबतीत आम्ही नक्कीच श्रीमंत होतो.

टाकलेली साय, आंब्याची बाठ, पिझ्झ्याच्या कडा, अर्ध टाकलेलं ताट आणि मग हळूहळू टाकून देण्याचं काहीच वाटेनासं होतं. पुढे जाऊन ड्रॉईंग चुकलं म्हणून न खोडता सरळ चुरगळून टाकलेला कागद, सोल झिजला तर तो न चिकटवता टाकून दिलेला बूट, दर २-३ वर्षांनी बोर झालं म्हणून बदललेल्या गाड्या आणि थोडंसं नाही पटलं तर लगेच बदललेले बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड. आणि मग तक्रार “हि आजकालची पिढी म्हणजे…. ” 

“अहो- आता बास… त्या पातेल्याला भोक पडेल” – बायको सांगत होती. सगळे माझ्याकडे बघून हसत होते. मी माझ्या ध्यानातून बाहेर आलो. चमचा भरून सायीचा बोकाणा भरला… आहाहा… सुख!

मग… उद्यापासून सायीचं पातेलं खायला सुरवात करताय ना? ती गरिबी नाही… चिंधीगिरी नाही…

तो संस्कार आहे.

लेखक : योगिया

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

खूप छान लेख तुम्ही प्रस्तुत केल्यामुळे वाचायला मिळाला . आंब्याच्या बाठीत माझाही जीव अडकला.😂