श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “कशी करू स्वागता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“हे रे काय शशांक !आज तू पुन्हा विसरलोस म्हणतोस!तूझ्या घरच्यांना तू सांगणार सांगणार म्हणालास आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल आणि आपल्या लग्नाबद्दल… आठवडा उलटून गेला तरी अजूनही तुला घरी तुझ्या आईबाबांना सांगता आलं नाही… का त्यांचा आपल्या प्रेमाला, लग्नाला विरोध होईल याची भीती वाटतेय का?… पण त्यांनी नकार देण्याचं एक तरी ठोस कारण त्यांच्या कडे असेल असं तुला तरी वाटतयं का?.. नाकीडोळी नीट, गौर वर्ण, तुझ्या इतकीच उच्च विद्याविभूषित, सुखवस्तू कुटुंबातील, बॅंकेत अधिकारी पदावर नोकरीत… आणि मुख्य म्हणजे दोघेही कोब्रा.. मग त्यांना अडचण कसली येतेय!.. का तुला घरी सांगायला धीर होत नाही!… अजूनही या वयात त्यांना घाबरतोस. !. तु घेतलेला निर्णय त्यांना मान्य होणार नाही असं वाटतयं!.. मग हा विचार आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा नाही तुझ्या डोक्यात आला?… आता माझे घरचे तर कधीचे वाट पाहत खोळबंलेत तुझ्याकडचा हिरवा कंदील दिसल्यावर रितसर तुझ्या घरी येऊन आईबाबांशी बोलयला ठरवायला येण्यासाठी… आणि आणि तू अजून साधं घरी बोलला देखील नाहीस!… काय म्हणावं तुझ्या या डरपोक स्वभावाला!… कधी ? कशी ? तड गाठणार आपण!… तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहेना? का ते देखील वरवरचं आहे… तसं काही असेल तर आताच सांग बरं.. मग आपल्याला आपले मार्ग बदलायचे म्हटले तर तसा विचार करता येईल… गेली दोन तीन वर्षे आपण याच ठिकाणी रोजचं भेटत आलो आहोत आणि इथेच व्हायची असेल कायमस्वरूपी ताटातूट तर ती देखील इथेच होउन जाऊ दे… काय होईल मनाला फार लागेल… हिरमोड होईल काही दिवस… पण हळूहळू नंतर मन स्थिर होत जाईल… प्रेमभंगाचं दुख तसं विसरू म्हणता कधीच विसरता येत नाही हेही तितकंच खरं.. पण असं एकट्यानं पुढचं आयुष्य कसं काढणार नाही का?.. तेव्हा मीच आता पुढाकार घेते आणि सांगते आतापासूनच आपण दूर होणं चांगलं होईल… जे झालं ते कधी घडलचं नव्हतं असं समजूया आणि पुढे आपण वेगवेगळ्या वाटेने जाऊया. !.. तुला माझ्या कडून प्रेमपूर्वकशुभेच्छा. !.. चल मी आता इथं फार वेळ थांबत नाही निघतेय… “
. “.. अरे हे काय ?ते कोण बरं आपल्या कडे येतायेत? माझ्यातर ओळखीचे कोणी दिसत नाहीत… शशांक तू ओळखतोस काय त्यांना?.. ते आता आपल्या दोघांना इथं बघूनच आणखी जवळ येऊ लागलेत!…. आपल्या दोघांना ते ओळखत तर नसावेत ना?.. मग तर टांगा गावभर फिरलाच म्हणायला हवा!… “
. “.. तेजश्री अगं ते माझे आई बाबाच आलेले दिसतायेत!… बापरे म्हणजे ज्याला मी घाबरत होतो तेच मी आता रंगे हाथ पकडला गेलो. !.. तेजू आता माझी काही धडगत दिसत नाही गं. !.. ते काय बोलतील कसं वागतील याचा काही अंदाज येत नाही!… पण तु काही घाबरून जाऊ नकोस ते तुला काही बोलणार नाहीत.. बोलतील ते मलाच… हं आता काय आलीया भोगासी असावे सादर… जे जे काय होईल ते ते पाहत राहावे… आणि जो निर्णय देतात तो स्विकारणे हेच बरे!… काहीही न बोलता उभे राहणे हेच इष्ट… “
… ‘अरे शशांक तू इथे काय करतो आहेस? आणि हि कोण आहे तुझ्या बरोबर? ऑफिस सुटल्यावर तू रोज गाण्याच्या क्लासला जातो असं सांगून घरी उशीरापर्यंत येत असतोस तर हाच आहे वाटतं तुझा गाण्याचा क्लास… अगदी हिंदी सिनेमातील गाण्यातून दिसणारा हिरो हिराॅईन झाडाझुडपातून लपून छपून गाणी म्हणत असतात तसाच चालत असतो काय इथं रोजचा क्लास?. आणि काय रे काय नाव आहे तुझ्या या गाणं शिकविणाऱ्या देवीचं?… रोजचा रियाज इथचं होतो कि आणखी कुठं बैठक होते… आम्ही दोघं आज जरा आमच्या पूर्वीच्या जुन्या आठवणींच्या ठिकाणी जाऊन त्यावेळेच्या… म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीच्या आठवणीना उजाळा द्यावा म्हणून इकडे आलो होतो.. ते झाडं आम्ही शोधत असताना नेमके दोघं त्याच झाडाखाली दिसले… क्षणभर आम्हीच आम्हाला त्यावेळेचे दिसून आले… कोण आहेत ते आणि कसे दिसतात… त्यांना आपला अनुभव सांगावा कि या झाडाखाली प्रेम करणाऱ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतात असं हे शुभ शकुनाचं झाडं आहे… तुमचं देखील प्रेम सफल होवो असं शुभ चिंतन पर बोलावं महणून झाडाजवळ जाऊ लागलो तर तो तू दिसलास या देवी बरोबर… तुमचे सुर तर चांगलेच जुळलेले दिसतात शिवाय तालही छान धरलेला दिसतोय… मग देवींनी आपल्या बंद्याला गंडा कधी बांधायचं ठरवलयं?… का अजूनही आरोह अवरोहात गाणं गुंतून पडणार आहे… आम्हाला बोलवा बरं गंडाबंधनाच्या मुहूर्ताला… ‘
‘ आई बाबा तुम्हाला सांगणार होतोच!… पण सागंयाचचं कसं?… असो आता तुम्ही दोघही इथं अचानक येऊन मला पकडलतं तर सांगूनच टाकतो… हि तेजश्री… आम्ही दोघं दोन तीन वर्षापासून एकमेकांना भेटत आलो आहोत.. आणि आता आम्ही लग्न करण्याचं निर्णय घेतला आहे… तेव्हा तुमची संमती… “. ती तर आम्ही तेजश्रीच्या आईबाबांना मघाशीच कळवली आहे… तेव्हा तुला काय वेगळी द्यायला नको… आणि काय रे शशांक या गोष्टी आपल्या घरी वेळीच सांगायच्या असतात!… प्रेमात माणसानं निर्भीड असावं लागतं… डरपोक, बुळ्या असून चालत नाही.. वेळेवर निर्णय घेणं जास्त महत्त्वाचं नाहीतर चौदहवी का चाॅंद झालाच म्हणून समजा… “
“पण आई बाबा आज अचानक इथचं येण्यामागचं प्रयोजन कसं ठरलं.. ?”.
“अरे शशांक तेजश्रीचे आई बाबा आज आपल्या घरी आले होते आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा सुखद धक्का तुम्हाला देण्याचा ठरवला… आणि तुमचं येत्या आठवड्यात गंडाबंधनाचा मुहूर्त आम्ही काढलाय बरं.. तेव्हा लागा आता तुमच्या नव्या मैफिलीच्या तयारीला…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈