सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ दोन चाकं झपाटलेली… सुमेध वडावाला (रिसबूड)☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव- दोन चाकं झपाटलेली

शब्दांकन- सुमेध वडावाला (रिसबूड)

अनुभव कथन – सतीश आंबरेकर

प्रकाशक- नवता बुक वर्ल्ड

मूल्य -350रु.

‘दोन चाकं झपाटलेली’  ही आहे भ्रमणगाथा 3 सायकस्वारांची. साहसवीरांची. ‘ग्लोबल सायकल एक्स्पीडिशन’ या मोहिमेअंतर्गत प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा, भारताच्या वतीने जगाला संदेश देत त्यांनी ही मोहीम पार पाडली. हे तीन वीर म्हणजे सतीश आंबरेकर, महेंद्र आणि मख्खन. त्यांनी ३५,००० की.मी. अंतर सायकलने कापले. ३२० दिवसात २४ देश सायकलक्रांत केले. केलेल्या नियोजनाप्रमाणे त्यांनी काटेकोर प्रवास केला. नियोजनाप्रमाणे त्यांना इरॅक, इराण, अफगाणीस्तान आणि पाकिस्तान इथे मात्र जाता आले नाही. कारण त्यावेळी सद्दाम हुसेनने कुवेतवर आक्रमण केले होते व अमेरिका कुवेतच्या मदतीला धावून आल्याने, महायुद्धाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना तुर्कस्तानातूनच परतावे लागले. बाकी सारा प्रवास मात्र त्यांनी नियोजनाप्रमाणे पार पाडला.

या मोहिमेचं नियोजन ४३ महीने चालू होतं.  (डिसेंबर ८५ ते १९ मे १९८९नोहेंबर) व्हिसाची गुंतागुंत, खर्चाचं टेबल, न्यायच्या सामानाची यादी, कामाची यादी…. आशा किती तरी गोष्टींचं नियोजन करावं लागलं होतं. जेसीजचे राजकुमार यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने ही मोहीम स्पॉन्सर केली आणि मोठाच प्रश्न सुटला.

या भ्रमणात आलेल्या अडचणी, मोहिमेतल्या गमती जमाती, आव्हानं, अविस्मरणीय प्रसंग यांची स्मरणगाथा म्हणजे ‘दोन चाकं झपाटलेली’ हे प्रवासवर्णन.  हे प्रवासवर्णन खरे पण अन्य प्रवासवर्णनापेक्षा हे प्रवासवर्णन वेगळे आहे. अन्य प्रवासवर्णनात स्थलवर्णनाला जास्त महत्व असते. इथेही स्थलवर्णन आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्व आहे अनुभव कथनाला. हे अनुभव कथन केले आहे, सतीश आंबरेकर यांनी आणि शब्दबद्ध केलेत सुमेध वडावाला यांनी. पुस्तक वाचताना वाचकाला वाटतं, आपणही त्या तिघांच्या मागोमाग सायकलवरून जातोय. त्यांच्याबरोबर तेच अनुभव आपणही घेतोय. यातच या पुस्तकाचे यश सामावले आहे. 

२५ नोहेंबर १९८९ला ते कलकत्त्याहून थायलंडला विमानाने निघाले. ९०मधे त्यांची मोहीम पूर्ण झाली. आणि पुस्तक निघाले ३० मार्च २०१४ला. म्हणजे मोहीम पार पडल्यानंतर तब्बल २४ वर्षांनी. पण मोहिमेच्या वेळी सतीश आंबरेकरांनी सतत टिपणे काढली होती. त्यामुळे अनुभव कथन करताना काही अडचणी आल्या नाहीत.

मलेशियात त्यांच्या लक्षात राहिला तो जगातला सगळ्यात उंच ध्वजस्तंभ आणि त्याच्या साक्षीने होणार्यात मोटरसायकलच्या बेकायदेशीर शर्यती. या शर्यतीत बेटिंग होतं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. स्पर्धा संपल्यावर  पोलीस कायदेशीर कारवाई करतात आणि मोटरसायकलस्वारांना नियम मोडला म्हणून पकडतात. स्पर्धेचे संयोजक जामीन भरून त्यांना सोडवतात,

त्यानंतर पुढे विमानाने ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर, तिथे प्रचंड तापमान, उकाडा आणि उलट दिशेने वाहणारे वारे यामुळे या सहसवीरांची चांगलीच दमछाक झाली. तिथे टोनी विंबरा या मेयरमुळे त्यांची सिडनी टाईम्सला, मोहिमेचा हेतू, स्वरूप, अनुभव याबद्दल मुलाखत प्रसिद्ध झाली. रेडिओवर त्यांच्याबद्दल स्पेशल अनाऊन्समेंट झाली आणि ती ऐकून एका हॉटेल मालकिणीने जेवणाचे बील घ्यायचे नाकारले. भारतीय एंबसीतील मुख्य अधिकारी दुगेसाहेब यांच्या स्वागताशील आतिथ्यामुळे त्यांचं ऑस्ट्रेलियातील वास्तव्य व पर्यटन सुखावह झालं.

ऑस्ट्रेलियातून १४ तासांच्या विमान प्रवासानंतर अमेरिकेत लॉस एंजेलीसला पोचले, तेव्हा हवामान अगदी विरुद्ध होतं. इथे प्रचंड थंडी होती. उणे तापमानात सायकलिंग करावं लागलं. त्यापूर्वी लॉस एंजेलीस ते अल्बुकर्की हा प्रवास डोंगराळ प्रदेश आणि स्नो फॉल यामुळे रेल्वेने करावा लागला. स्नो फॉलमुळे अल्बुकर्कीत दोन दिवस अडकून पडावं लागलं. तिथे त्यांनी एक म्युझियम पाहिलं. त्यातली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आशी की तिथे काही प्राण्या-पक्षांचे मुखवटे होते. त्या मुखवट्याला तांत्रिक कृत्रीम डोळे बसवले होते. त्या त्या प्राण्या-पक्षाला, माणसासह सारं, भावताल कसं दिसतं , ते त्या कृत्रीम डोळ्यातून बघता येत होतं. सतीशने मधमाशीचा मुखवटा घातला. त्याला दिसलं, तिला प्रत्येक वस्तूच्या 9 प्रतिमा दिसतात. त्यातल्या मधल्या भागावर ती सोंड लावून फुलातला मध शोषून घेते किंवा डंख करते. दुसर्यािच्या शरीरात काटा टोचून ती डंख कशी करते, हेही त्याला कळलं.

ऑक्लोहोम येथील ‘ वेस्टर्न ‘ मोटेलचे मालक कांती आणि तारा पटेल यांनी त्यांचं मनापासून स्वागत आणि आतिथ्य केलं. दरात सूट दिली. सायकल स्वारांना त्यांनी आपली जीवन कहाणी ऐकवली. रेकॉर्ड प्लेअर आणि हिन्दी गाण्याच्या कॅसेट्स ऐकायला दिल्या. प्रत्येक मुक्कामात तुम्ही डॉलर्सचा हिशेब करत असणार, असं म्हणत त्यांचे आंघोळीचे कपडेही धुवून दिले. त्यांच्या मार्गावरील ठिकाणे विचारून भारतीय मोटेल मालकांचे पत्ते वं फोन नंबरही दिले. अशाच आतिथ्यशील आणि सहकार्य करणार्याे अनेक व्यक्ती त्यांना पुढेही भेटत गेल्या. क्वचित कुठे कटू अनुभवही आले.

अमेरिकेच्या आडीच महिन्याच्या प्रवासाबद्दल ते म्हणतात, ‘या प्रवासात आम्ही जणू आमच्या अंगावर चिलखते चढवली होती. पण हवामानाने त्याची पत्रास बाळगली नाही. या सगळ्या प्रवासात त्यांनी तीनही ऋतु अनुभवले. मलेशियात धो धो पाऊस, ऑस्ट्रेल्यात प्रचंड उन्हाळा आणि अमेरिकेत जीवघेणी थंडी.

भ्रमंती कटकसरीनेच करायची होती, त्यामुळे बहुतेक सगळे मुक्काम, जेसीजच्या युथ हॉस्टेल, मोटेल किंवा तंबू ठोकून करावे लागले. या भ्रमंतीतं त्यांनी निसर्गनिर्मित वा मानव निर्मित चमत्काराबरोबरच आणखीही काही अनवट गोष्टी पाहिल्या. सायकल दुरुस्तीला क्लिफोर्ड यांच्या दुकानात गेले असता त्यांच्या खापर पणजोबांच्या, खापर पणजोबांची आदिम सायकल पाहिली. तिचं पुढचं चाक पुरुषभर उंचीचं होतं, तर मागचं चाक मुलांच्या सायकलइतकं लहान होतं. त्यांनी ती सायकल चालवूनही दाखवली. १८६७साली तयार झालेली ही सायकल होती.

शतकापूर्वी मातीत सोन्याचा अंश सापडल्याने सुवर्णभूमी ठरलेली आणि आता तिच्यातील सुवर्णाचा अंश संपल्याने आता ओसाड झालेली ‘भूतनगरी’ पाहिली. न्यूड बीचवरचं नग्नविश्व पहिलं. हंगेरीत झाडा-फुलांचं सुरेख उद्यान, नशाबाजांसाठी राखीव ठेवल्यामुळे तिथे सुयांच्या खचामुळे उद्यानाचा नीडल पार्क झालेला पहिला. दुसर्यां नी टाकून दिलेल्या उष्ट्या ताटात जेवण्याइतकं दारिद्र्य असलेली माणसं पाहिली.

हॉलंडच्या गुरुद्वारात खलिस्तानी पासपोर्ट, व्हिसा, खलिस्तानी चलनाच्या प्रतिकृती पाहिल्या आणि त्यांचे मन संताप आणि शोक अशा संमिश्र भावनेने विषण्ण झाले.

त्यांनी आपल्या या प्रवासात काय काय आणि किती किती पाहिलं, हे समजून घेण्यासाठी मूळ पुस्तकंच वाचायला हवं.

पुस्तकात आनेक ठिकाणी साध्या वाक्यांऐवजी संमिश्र आणि संयुक्त वाक्याचा  उपयोग झालाय. तसेच नवनवीन सामासिक शब्द घडवण्याचा सोसही दिसतो. या दोन्हीमुळे पुस्तक थोडं बोजड झालय. वाचताना गतीमानता उणावते. त्याचप्रमाणे सर्व आशय सलगपणे आलेला आहे. त्याऐवजी प्रत्येक देशाचे स्वतंत्र प्रकरण केले असते, तर आशय अधिक आकलनसुलभ झाला असता. पण एवढं सोडलं, तर पुस्तक वाचनीय आहे. अनुभवविश्व समृद्ध करणारं आहे.

शब्दांकन- सुमेध वडावाला (रिसबूड)

अनुभव कथन – सतीश आंबरेकर

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments