सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ तसली… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
आईने सांगितलं होतं, ”कुमुदला बोलू नकोस, ” म्हणून. पण ही मोरपिशी साडी नेसलेय, म्हटल्यावर तिला संशय आलाच.
“काय गं? आज कुठे जाणार आहात?”
मी उडवाउडवी करण्याचा प्रयत्न केला, पण ती खनपटीला बसली.
शेवटी सांगावंच लागलं तिला, “आज नवीन घर बघायला जाणार आहोत, ” म्हणून.
“अरे वा! दोघंच जाणार?”
“यांचे आईवडीलही येणार आहेत. ”
“मजा आहे बाबा. नाहीतर आमचं नशीब !”
कधीकधी दया यायची तिची. आतापर्यंत साठ-सत्तर नकार पचवूनही तिचं नशीब तृप्त झालं नव्हतं.
आणि माझं लग्न तर पहिल्या फटक्यात जमलं. त्यामुळेच आई घाबरत असते, कोणाची तरी दृष्ट लागेल, म्हणून.
कुमुदची अवस्था आता अशी झालीय, की समोरच्याने होकार दिला तर तो कसाही, अगदी कसाही असला, तरी ही लग्नाला तयार होईल.
मला मात्र ‘बघायला’ आलेली मंडळी बाहेर पडल्याबरोबर आईने विचारलं होतं, “तुला पसंत आहे ना गं?मला तरी बरा वाटला. ”
“ सगळ्यांसमोर कोणीही चांगलंच वागणार ना!”
“पण तुम्ही दोघंच बोललात की आत बसून. ”
“ते काय? दहा मिनिटंच तर बोललो. ”
“काय बोललात गं तुम्ही?” दादाने विचारलं, “माहीत असलेलं बरं. तुझ्यानंतर माझा नंबर लागणार. ”
“विशेष काही नाही. नेहमीचंच. म्हणजे त्यांनी विचारलं, सिनेमा आवडतो का?दर महिन्याला जाता की क्वचितच कधी?”
“मग तू काय सांगितलंस?”दादाने विचारलं.
“मी खरं ते सांगितलं. म्हटलं, ‘दर महिन्याला गेलेलं आई -बाबांना नाही आवडत. मी आपली तीन-चार महिन्यांनी जाते. ’तर ते हसले. मग त्यांनी विचारलं, ‘आराधना’ बघितला का?’ ”
“ हा एकदम टिपिकल प्रश्न. हल्ली कोणीही कोणालाही भेटलं, की हा प्रश्न विचारणारच, ” दादा म्हणाला.
आईला यात अजिबात रस नव्हता – “ते जाऊ दे. तुझ्या नोकरीचं काय म्हणाले?”
“तो विषयच नाही निघाला. ”
“ वाटलंच. बरं झालं, मी त्यांच्या आईशी बोलले ते. त्या म्हणाल्या, ‘आमचं काही म्हणणं नाही. लग्नानंतर तिला नोकरी करायची असली तर करू देत. सोडायची असेल, तरी हरकत नाही. ’ प्रदीपरावांचंही मत कळलं असतं, तर बरं झालं असतं. ”
आईचं म्हणणं मला फारसं पटलं नव्हतं.
अर्थात आपल्याकडे लग्नं अशीच होतात.
आजी-आजोबांच्या काळात मोठी माणसंच सगळं ठरवायची. वधूवरांना काय कळतंय त्यातलं, हे सगळ्यांच्याच मनावर ठसलेलं असायचं. अंतरपाटापलीकडे कोण आहे, याचीही कल्पना नसे.
आई-बाबांच्या काळात, म्हणायला बघण्याचा समारंभ व्हायचा, पण वधूवरांकडे निर्णय स्वातंत्र्य कुठे होतं?
आणि आता, आपल्या पिढीतल्या मेधाताई, प्रशांतदादा यांच्या लग्नांत मला वाटतं, असंच झालं असणार – ‘नाही’ म्हणण्यासारखं काही नाही ना?मग ‘हो’ म्हणा.
मी बसस्टॉपवर पोहोचले, तर ते आधीच येऊन थांबले होते.
“छान दिसतोय हा रंग तुला. शालूही असाच घ्यायला हवा होता. ”
मी लाजले. त्यांना होकार देण्याचा निर्णय घेतला, हे बरंच झालं, असं माझ्या मनात आलं.
“आई-बाबा तिथेच भेटणार आहेत?”
“त्यांना नाही जमणार. कामं खूप राहिलीयत अजून. दोघंच गेलो तर चालेल ना?”
मी मानेनेच होकार दिला.
लॅच उघडलं आणि हाताने, आधी मला आत शिरायची खूण करत ते म्हणाले, “या, राणी सरकार! आपल्या महालात प्रवेश करा. ”
माझं घर! माझं स्वतःचं घर! माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
चार खुर्च्या, टेबल. बाहेरच्या खोलीत एवढंच सामान.
“फर्निचर घ्यायचंय. बेसिक गोष्टी घेऊन ठेवल्यात. बाकीचं घर तू तुझ्या आवडीने सजव. ”
मनात गुदगुल्या झाल्या. तसं माहेरचं घर पण आपलंच होतं. तरीही, ‘नवीन काही घेऊ या, ’ म्हटलं, की पहिला आर्थिक आक्षेप असायचा. नंतर ‘ठेवणार कुठे?’ तेही खरंच. नाही म्हटलं तरी एवढ्या वर्षांच्या सामानाची भरताड होती. ‘तुझ्या घरी गेल्यावर तू हवं ते घे, ’ याने इतिश्री. ‘तिथेही एकत्र कुटुंब असलं तर…’ माझ्या मनातली ही शंका कधी ओठांवर नाही आली म्हणा.
स्वप्न पुरं होण्याच्या मार्गावर होतं. सासू-सासरे, मोठे दीर-जाऊ आधीच्या घरात राहणार होते. यांनी हे नवीन घर घेऊन ठेवलं होतं.
किचन बऱ्यापैकी ऐसपैस होतं. मुख्य म्हणजे रिकामं होतं. त्यामुळे आपल्याला हवी तशी भांडी, वस्तू वगैरे घेऊन मनासारखं घर सजवता येणार होतं.
छान एकसारखे दिसणारे डबे, लागतील तेवढीच भांडी घ्यायची. नाही तर आईकडे, सासूबाईंकडे डब्या-भांड्यांचं म्युझियम झालंय नुसतं.
यांच्या पगारात घर चालवायचं आणि आपला पगार घर सजवायला.
पहिली आवश्यक ती भांडीकुंडी, नंतर बेड आणि कपाट.
कपाटात, लॉंड्रीत लावतात तसे कपडे लावून ठेवायचे. आपल्या साड्या, यांचे शर्ट-पॅंट…यांचे आणि आपले कपडे एकत्र, या विचारानेच मन मोहरून गेलं.
“खूश?” यांनी विचारलं.
उत्तर मी नाही, माझ्या चेहऱ्याने दिलं.
“आज काय मुक्याचं व्रत आहे वाटतं!”
बाप रे! तो शब्द ऐकूनच मी लाजून चूर झाले. माझी मान खाली असूनही यांची माझ्यावर खिळलेली नजर मला जाणवत होती.
“चल. आता खास दालन. ”
खास दालन. म्हणजे बेडरूम!
बेडचं उद्घाटन अगदी सिनेमातल्यासारखं करायचं. बाजूला फुलांच्या माळा, खाली बेडवर गुलाबाच्या पाकळ्या. मुलायम, सुगंधित, रोमॅण्टिक वातावरण. मी घुंगट घेऊन बसलेय आणि…
हो असंच. जेव्हा कधी बेड घेऊ तेव्हा…. मग लग्नानंतर काही महिने झाले असले, तरीही पुन्हा एकदा सुहाग रात साजरी करायची. त्या नव्याकोऱ्या बेडवर. त्या खास दालनात प्रवेश करताना यांनी माझ्या खांद्यावर निसटता हात ठेवला. ठेवला की चुकून लागला? की भास झाला मला?
समोर डबल बेड! चक्क डबल बेड!
पूर्वी चंदूदादाचं नवीन घर बघायला गेलो, तेव्हा असाच डबल बेड होता तिथे. तो बघितल्यावर आपल्यालाच नव्हे, तर आई, मावशीलाही कानकोंडं झालं होतं. आणि आता आपल्या घरात डबल बेड!
“ये ना, आत ये. ”
का कुणास ठाऊक, पण हा बेड वापरलेला असावा, असं मला जाणवलं.
“काय गरम होतंय!” म्हणत त्यांनी अंगातला शर्ट काढला. कपाट उघडून आतला हॅंगर आणि नॅपकीन बाहेर काढला. शर्ट हॅंगरला लावून खुंटीला टांगला. “हात-पाय धुवून येतो, ” म्हणून ते बाथरूममध्ये गेले.
कपाटाच्या फटीतून मला रंगीबेरंगी काहीतरी दिसलं होतं. त्यांनी बाथरूमचं दार लावल्याची खात्री करून घेऊन मी कपाट उघडलं, तर काय? आतमध्ये यांच्या लुंग्या, गंजीफ्रॉक आणि त्यांच्या जोडीला गाऊन, बायकांचे आतले कपडे, शिवाय पावडर, कुंकू, कंगवा. मी पटकन दार बंद केलं.
काय भानगड आहे?, म्हणजे मला जाणवलं, ते खरं होतं. यांनी हा बेड आधी वापरलाय. कोण जाणे कोणाबरोबर?की एकीपेक्षा जास्त…?
नक्कीच. बेडशेजारी एक छोटं स्टूल होतं. त्या स्टूलवर तांब्या पेला होता. बाजूला एक हेअरपिन पडली होती.
यांच्या मनात आहे तरी काय? घरात यांच्याबरोबर मी एकटीच. खिडकीही बंद आहे. बाप रे!
केस, तोंड खसाखसा पुसत ते बाहेर आले.
“हाsss. बरं वाटलं. तूही तोंड धुऊन घे. ”
“नको. ठीक आहे. ”
त्यांनी खिडकी उघडली.
मला जरा सुरक्षित वाटलं. पण बाहेर बघितलं, तर लांबलांबपर्यंत कोणतीच बिल्डिंग दिसत नव्हती. म्हणजे यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं, तर कोणालाच कळणार नाही. मग कोण येणार माझ्या मदतीला?मला धडकी भरली. उगाच आले यांच्याबरोबर.
पंखा चालू करून ते बेडवर बसले. शर्ट न घालताच. गंजीफ्रॉकमध्ये.
यांना काहीच कसं वाटत नाही?अशा कपड्यात, एका परक्या बाईसमोर…. तशी मी परकीच आहे ना अजून.
“ये ना. बस. ”
“नको. ”
“अगं, ये. ”
मी मानेनेच ‘नाही’ म्हटलं. त्या तसल्या बेडवर मला बसायचंही नव्हतं.
“ये तरी, राणी, ” त्यांनी दोन्ही हात पसरून मला विनवले. “अगं, इतर कोणी नाही इथे. आपण दोघंच तर आहोत. ये ना. ”
मी जागेची हलले नाही. हे काहीतरी विचित्र घडू पाहतंय…माझ्या मनात पाल चुकचुकू लागली.
“ये ना. चार दिवसांनीच तर लग्न होणार आहे आपलं. ”
आणि अचानक मला कंठ फुटला, “होणार आहे. झालं नाहीय अजून. ”
“काय फरक पडतोय! चारच दिवस उरलेयत म्हणजे लग्न झाल्यातच जमा आहे. ”
“ ‘जमा आहे, ’ म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष झालेलं असणं वेगळं. ”
“माझ्यावर अविश्वास दाखवतेयस तू?”त्यांच्या आवाजाला ‘इगो’ची धार होती.
“अविश्वास नाही हा. उलट तुम्ही माझा अनादर करताय. तुम्हाला मी…मी… ‘तसली’… ‘तसली’ बाई वाटले …मी तुम्हाला?” रागाने माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते;पण मी बोलतच गेले, “किचन रिकामं, हॉल… सजवायचाय…आणि…बेडरूम तयार?काय आहे याचा अर्थ?… म्हणजे…माझ्या आधीही इथे कोणी…”
“शट अप! इतकं टोकाला जायची गरज नाही. ”
“मी …अशा माणसाबरोबर…आयुष्य काढू शकत नाही. मोडतेय…मी…हे लग्न. ही घ्या…तुमची अंगठी. ”
बोटातली साखरपुड्याची अंगठी काढून मी त्यांच्या दिशेने भिरकावली.
त्या घरात क्षणभरही थांबणं मला शक्य नव्हतं. मी तडक बाहेर पडले.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈