सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ ऊन पावसात नहाते… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
ऊन पावसात नहाते
माळ मोत्यांची गुंफते
गर्द कोवळ्या वेलींना
जणू चांदणे झुलते ||
*
हिरव्या हिरव्या रानावरी
जणू लखलख चांदणे
लांबसडक गवतावरी
थेंबा थेंबाचे झुलणे ||
*
ऊन पावसात नहाते
रान सोनपिवळं होते
हिरव्या रानाला जणू
चांदण चाहूल लागते ||
*
ऊन पावसात नहाते
सरीमागून वेडावते
रंग पोपटी रानभर
झालर रेशमी लागते ||
*
ऊन पावसात नहाते
गंध स्मृतींचा उधळते
श्रावणातल्या झुल्यासवे
मना आठवांचे हिंदोळे ||
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈