सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ पंढरीचा विठ्ठल… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
पंढरीच्या विठ्ठलाने
मज लावलाय लळा
तेच माहेर गा माझे
तोच आनंद सोहळा
*
व्याप संसाराचा मोठा
त्यात गुंतलेला पाय
इथे भेटालागी येते
माझी सावळी ग माय
*
सडा शिंपताना दारी
हात रेखता रांगोळी
रंगातून सुखे हासे
तिची मुरत वेगळी
*
केर काढता घरात
मल मनाचा ती काढे
संसाराची ओढ मनी
आपसूक मग वाढे
*
चुलीपाशी रांधताना
मुखी पांडुरंग नाम
घास कुटुबांच्या ओठी
तृप्त भक्तीमय धाम
*
सारे आवरता काम
पाठ टेकता धरणी
मिटलेल्या डोळ्यातुन
चंद्रभागा इंद्रायणी
*
त्या पवित्र जलातुन
वाहतसे श्रमताप
मुखी पांडुरंग हरी
उमटते आपोआप
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈