मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतर्बोल… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अंतर्बोल… ☆ सौ राधिका भांडारकर

जे जमले नाही आज

उद्या नक्की जमेल

का सोडायचे यत्न

संधी पुन्हा मिळेल…

 

नसतो कधी स्वप्नांना अंत

पुन्हा पुन्हा जगावे

मिटलेल्या स्वप्नांसाठी

श्र्वास पकडून ठेवावे…

 

मोडले परी वाकले नाही

विश्र्वास आहे मनामध्ये

सामोरी जाईन समस्यांना

जोर आहे धमन्यामध्ये…

 

राखेतून जन्म घेतो

पक्षी फिनीक्स जिद्दीचा

पंखात असता शक्ती

वेध घ्यावा उडण्याचा…

 

पुन्हा होईल पहाट

संपेल हा अंधार

वाट मी पाहीन

पेटेल एक अंगार….

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈