सुश्री आरूशी दाते

अभिव्यक्ती स्वातंत्र्य – गरज व अतिरेक…

(e-abhivyakti में सुश्री आरूशी दाते जी का  स्वागत है। ई-अभिव्यक्ति में अभिव्यक्ति की स्वतन्त्रता एवं उससे संबन्धित तथ्यों पर विचारपरक लेख निःसन्देह एक उपहार ही है। इस आलेख के लिए हम सुश्री आरुशी जी के हृदय से आभारी हैं। )

अभिव्यक्ती ही देवाने दिलेली निसर्गदत्त देणगी आहे. प्राण्यांनासुद्धा ही देणगी आहे, पण मनुष्यप्राणी अधिक चांगल्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गाने अभिव्यक्त होऊ शकतो. त्याच्या बुद्धीची भरारी गगनाचा ठाव घेऊ शकते…

अभिव्यक्त होताना मग ते प्रेमरूपात असो, राग असो, अबोला असो, इतकंच काय गायन, वादन, नृत्य, चित्रकला किंवा शिल्पकला असो, नैसर्गिक असल्यामुळे अभिव्यक्ती थांबवता येणारच नाही, ती फक्त कधी, कशी आणि कुठे करावी हे नक्कीच ठरवू शकतो… हे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तिला मिळणं गरजेचं आहे, त्याला कारणंही तितकीच महत्वाची आहेत…

अभिव्यक्त होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे, आपल्या विचारांचा मनाशी, भावनांशी झालेला वाद-संवाद अभिव्यक्तीतून प्रगट आणि प्रगत होत असतो. वर म्हटल्याप्रमाणे त्याचे मार्ग अनेक आहेत, पण अभिव्यक्त होण्याची खरंच गरज आहे का? तर निःशंकपणे हो, हेच उत्तर मिळेल…

आपल्या मनातील भाव जर दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्यात दोन पायऱ्या आहेत… पहिली म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात व्यक्त होणे (अंतस्थ अभिव्यक्ती), आपल्याला स्वतःला काय वाटतं, ह्याचा अभ्यास करून बाह्यरूपात व्यक्त होणं गरजेचं आहे… त्यासाठी मनन, चिंतन आवश्यक आहे… ह्यावर आपली क्रिया अवलंबून असते…

उदाहरणार्थ, भूक लागली असेल तर, तसा संदेश मेंदूकडून मिळतो, तो मिळाला कि मनातल्या मनात भुकेची भावना जागृत होते, पोट रिकामं आहे, हा विचार मनात येतो, काही तरी खाल्लं पाहिजे नाहीतर विपरीत परिणाम होऊ शकतो हा संवाद घडतो (अंतस्थ अभिव्यक्ती)… मग खायचं कि नाही किंवा काय खायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि त्यानुसार क्रिया केली जाते…

म्हणजेच जेव्हा एखादा विचार मनात येतो, तेव्हा तो कदाचित आपल्याला भावतो किंवा भावत नाही. कदाचित विचारातूनच त्याची अनुभूती मिळते… तो AWARENESS आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपयोगी येतं… आपण मनात आलेल्या विचारांना RESPOND करतो कि रिऍक्ट करतो हे ठरवता येते, मात्र अभ्यासपूर्ण सवयीनेच होऊ शकते…ह्याबरोबरच ह्या स्वातंत्र्याची दिशा ठरवणेही गरजेचे आहे. म्हणजे आपला मुद्दा मांडताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत असताना नक्की काय मांडलं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि ते सर्वस्वी आपल्या हातात आहे…

तुम्हीच बघा ना… एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल किंवा एखाद्या माणसाचं मत आपल्याला पटत नसेल तर आपण लगेचच ते बोलून दाखवतो, समोरचा माणूस किती चुकीचा आहे, हे सांगायचा, मी तर म्हणेन ते सिद्ध करायचा आटोकाट प्रयत्न करतो… ह्यातून कदाचित आपला अहंकार नक्कीच सुखावतो, पण असे केल्याने आपण नक्की काय साध्य केलं ह्याचा अभ्यास होणं खूप आवश्यक आहे…. अभिव्यक्त होण्याच्या पद्धतीने माणसे दुरावू शकतात किंवा जवळ येऊ शकतात… ह्याबरोबर समोरच्या व्यक्तीलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हेच आपण विसरवून जातो, जे अयोग्य आहे….

तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे

१) विचार

२) त्यांच्याशी निगडित भावना (अंतस्थ अभिव्यक्ती)

३) त्यानुसार होणारी क्रिया (बाह्य अभिव्यक्ती)

ह्याचा सतत अभ्यास होणं आवश्यक आहे. नाहीतर अभिव्यक्तीसारख्या सुंदर देणगीचा अतिरेक होऊन अयोग्य गोष्टी घडायला वेळ लागणार नाही… ह्याचा अर्थ स्वत्व पणाला लावणे असा अजिबात होत नाही… पवित्रता, शांतता, सुख, समाधान, प्रेम, ज्ञान, शक्ती, युक्ती, सत्यता ह्यात कुठेच कमी पडणार नाही, ह्याची खात्री आहे आणि अभ्यासाने हे सहज शक्य आहे…

आता ह्यापुढची बाब लक्षात घेऊ या… विचार, भावना, क्रिया ह्या गोष्टी आयुष्याकडे किंवा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन ठरवतात, आणि मग त्याचेच रूपांतर सवयीमध्ये होऊ शकते, हीच सवय आपली वृत्ती बनते, त्यातूनच मानसिकता घडते आणि आपले व्यक्तिमत्व आकाराला येते… तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व नाकारून चालणार नाही आणि त्याचप्रमाणे त्याचा गैरवापर करूनही चालणार नाही…

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि कुटुंब ज्या समाजाचा किंवा देशाचा भाग आहे त्याच्या विकासासाठी, ते सुदृढ बनवण्यासाठी आवश्यक आहे, जीवन सुखकर बनवण्यासाठी, नवनवीन शोध, प्रयोग घडवण्यासाठी मनुष्य वैचारिक दृष्ट्या सशक्त होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याची सृजनशीलतेचा उपयोग नक्कीच होतो… यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप हातभार लागतो… पण अति तिथे माती, ह्या नियमानुसार स्वातंत्र्याचा अतिरेक स्वैराचारात बदलून हानी पोहोचवू शकतो किंवा हे स्वातंत्र्य हिरावून घेतले तर विपरीत परिणाम होऊ शकतात… स्वातंत्राबरोबर येणारी जबाबदारी लक्षात ठेवून त्याप्रमाणे क्रिया प्रतिक्रिया झाल्या पाहिजेत… गरजेचं व्यसन आणि त्याचा अतिरेक ह्यातील सीमारेषा ओळखता आल्या की अनेक गोष्टी सुखकर होतील, ह्यात दुमत नाही…

हल्ली आपल्याला मीडियाच्या माध्यमातून होणार अतिरेक नाकारता येणार नाही… आजकाल सोशल मीडियाला प्राधान्य दिलं जातं, त्यावर घडणाऱ्या अभिव्यक्ती कितपत योग्य किंवा अयोग्य असतात हेही किंवा त्याची पद्धत काय आहे ह्यावर अवलंबून आहे… त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव टाळता येईल की नाही ही व्यक्तिगत गोष्ट आहे… त्यामुळे नैसर्गिक गरज भागवण्यासाठी अभिव्यक्तीचं मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना त्याचा अतिरेक टाळून आनंदी राहता येते, त्या दृष्टीने अभ्यास सतत चालू ठेवला पाहिजे…

© आरुशी दाते

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Leena Kulkarni

खूप छान विवेचन केले आहे अभिव्यक्ती चे. अतिशय सुरेख पद्धतीने मांडणी केली आहे विचारांची. आपल्या लेखनाला मानाचा मुजरा

Ullhas Sontake

Good one…